उत्तर प्रदेशात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान करोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपासून लागू करण्यात आलेला कर्फ्यू रविवारी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी दिली. देशातील सर्व राज्यांसमोर करोना संकटाचे मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी करोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही.
“उत्तर प्रदेश राज्यात लागू असलेला करोना कर्फ्यू आता १७ मे पर्यंत लागू असेल. कोविड-१९ मधील वाढत्या प्रकरणांवर प्रभावीपणे अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळात आवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व आस्थापने बंद राहतील. विशेष म्हणजे गेल्या ३० एप्रिलपासून राज्यात कर्फ्यू लागू आहे. सुरुवातीला तो ३ मेपर्यंत कर्फ्यू लागू होता, परंतु नंतर त्याची मुदत ६ मेपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर, त्यात आणखी मुदतवाढ देताना ती १० मे करण्यात आली, जी आता वाढवून १७ मे केली आहे.
सरकारने कर्फ्यू कालावधी नुकताच वाढविला आहे. पूर्वीच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ असा की, आधीचे नियम पुढील दिवसदेखील लागू राहतील. या दरम्यान, लोकांना अनावश्यकपणे बाहेर जाण्यास मनाई आहे. बाजारपेठा बंद राहतील, शहरांमध्ये आठवडी बाजारांवर बंदी आहे. औद्योगिक आणि आवश्यक सेवांच्या हालचालींवर कोणतेही बंधन नाही. गर्दी रोखण्यासाठी आणि रहदारी मर्यादित करण्याच्या उद्देशाने होम डिलीव्हरी सर्व्हिसेसचे उपाय सांगितले जात आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने रविवारी निर्णय घेतला की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस पुढील काही दिवस राज्याच्या हद्दीच्या बाहेर जाणार नाहीत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बस पुढील काही दिवस केवळ राज्यातच चालवल्या पाहिजेत, असे योगींनी निर्देश दिले आहेत.
देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह
पहिल्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेनं सौम्य ठरवली असून, देशात दररोज चार लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील परिस्थितीही अशीच असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने चिंतेत भरच टाकली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार ९२ करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.