भारतात करोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात करोनाची स्थिती पाहता योगी सरकारने कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत लावण्यात आलेला कर्फ्यू पुढील सोमवारी म्हणजेच १० मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

याआधी ३ मे च्या सकाळपर्यंत लावण्यात आलेला कर्फ्यू ६ मे पर्यंत वाढवण्यात आला होता. पण आता त्यात १० मे रोजी सकाळी ७ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

योगी सरकारने मार्केट परीसरात कडक निर्बंध लावले आहे. अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक कामांवर कोणतेही बंधन नाही. मात्र वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यांपर्यंत रोडवेजच्या बसेस राज्याबाहेर जाणार नाहीत. आठवडी बाजारपेठा बंद राहतील. बाजारपेठांमध्येही दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या दरम्यान, लोकांना अनावश्यकपणे बाहेर जाण्यास मनाई असणार आहे.

उड्डाणांवरही काही निर्बंध आहेत. गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी विमान कंपन्यांना राज्यात येणार्‍या लोकांसाठी कोविड -१९ चा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्याचे आदेश दिले होते. विमानाने राज्यातून जाणाऱ्या लोकांनाही निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच रेल्वेने येणार्‍या प्रवाशांची संपूर्ण यादी तसेच त्यांची तपासणी करण्याचे आदेश सरकाने दिले आहेत.