मध्य भारतात अति ओलसर टप्पे  व अति कोरडे टप्पे यामुळे पूर व दुष्काळ यांचे चक्र मान्सूनच्या काळात चालूच राहील, असा इशारा स्टॅनफर्डच्या वैज्ञानिकांनी दिला आहे. भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांसह केलेल्या या संशोधनात असे दिसून आले, की दक्षिण आशियाई मान्सूनच्या काळात भारतात पाऊस व दुष्काळ या चक्राचे प्रमाण गेल्या १० वर्षांत वाढले आहे.
‘स्टॅनफर्ड वूडस इन्स्टिटय़ूट फॉर द एनव्हायर्नमेंट’चे नोआ डिफेनबॉग यांनी सांगितले, की वर्षांतील काही काळ पावसाचा अतिरेक होऊन त्याचा परिणाम होत आहे. दक्षिण आशिया उन्हाळी मान्सूनमध्ये वारे हवामानाचे स्वरूप बदलतात व  त्यामुळे भारतात ८५ टक्के प्रेसिपिटेशन होते व ते देशाच्या कृषी क्षेत्राला लाभदायी असते. या शोधनिबंधाच्या एक लेखक दीप्ती सिंग यांनी म्हटले आहे, की मान्सूनच्या महिन्यात जोरदार पाऊस पडतो हे खरे असले तरी एकूण पाणी किती मिळते हे महत्त्वाचे आहे.
 जर पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाऊस कमी पडला तर पिकांवर परिणाम होतो व त्याचा फटका भारताच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला बसतो. त्याच वेळी जास्त पावसाचे छोटे टप्पे २००५ सारख्या मानवी हानीच्या दुर्घटना घडवतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. डिफेनबॉग व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे, की अति पाऊस व अति दुष्काळ या दोन टप्प्यांचा मान्सूनच्या मोसमात अभ्यास केला असता गेल्या काही दशकात त्यात फरक दिसून येतो व ओलसर टप्पा म्हणजे तीन व जास्त दिवस लागोपाठ पाऊस व कोरडा टप्पा म्हणजे तीन किंवा जास्त दिवस लागोपाठ कोरडे जाणे अशी व्याख्या यात केली आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग व इतर स्रोतांकडून गेल्या साठ वर्षांची माहिती घेऊन हे संशोधन करण्यात आले आहे. यात मान्सूनचा सर्वोच्च पाऊस हा १९५१ ते १९८० तर १९८१ ते २०११ या काळात तुलनात्मक पद्धतीने तपासण्यात आला. या पथकाने जुलै, ऑगस्ट महिन्यातील दक्षिण आशियाई उन्हाळी मान्सूनचा पाऊस तपासला. मध्य भारताच्या विश्लेषणात सांख्यिकी साधनांचा वापर करण्यात आला. बालराजरत्नम हे सांख्यिकीतज्ज्ञ यात सहभागी झाले होते. जर समजा आज पाऊस झाला, तर उद्या पाऊस होण्याची शक्यता जास्त असते कारण वादळ प्रणाली तेथे असते. मान्सूनच्या माहितीचे विश्लेषण केले असता मान्सूनमधील एकूण पाऊसमान घटलेले दिसते पण परमोच्च मान्सून काळात पाऊस वाढलेला दिसतो. पावसाचे टप्पे व दुष्काळाचे टप्पे यांच्यात वाढ होत आहे व ते योगायोगाने घडत नाही, असे दीप्ती सिंग यांनी सांगितले. ‘नेचर क्लायमेट चेंज’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Story img Loader