नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी गव्हासह सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावात क्विंटलमागे १३० ते ३०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकारी तसेच निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही तीन टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीच्या तोंडावर हा मोठा दिलासा मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यामध्ये रब्बी हंगामातील गहू, चणाडाळ, मसूर, मोहरी, करडई आणि बार्ली या पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेला हा निर्णय भाजपप्रणीत महायुतीसाठी प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो, असे चित्र आहे. मात्र, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाचा निवडणुकांशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ‘शेतकऱ्यांच्या मनात आधीपासून सरकारबद्दल चांगल्या भावना आहेत’ असे ते म्हणाले. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

हेही वाचा >>>Nayab Singh Saini oath news: नायबसिंह सैनी यांचा आज शपथविधी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता

केंद्र सरकारचे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. १ जुलै २०२४ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही वाढ लागू करण्यात आली आहे. मागील १२ महिन्यांच्या महागाई निर्देशांकाच्या सरासरीच्या आधारे महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १ जानेवारी रोजी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करून तो ५० टक्क्यांवर नेण्यात आला होता. आता त्यात तीन टक्क्यांची भर पडली आहे. महागाई भत्ता हा मूळ वेतन किंवा निवृत्तिवेतनाच्या प्रमाणात देण्यात येतो. या निर्णयाचा फायदा ४९.१८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४.८९ लाख निवृत्तिवेतनधारकांना होणार असून त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर ९४४८.३५ कोटींचा भार पडणार आहे.

हमीभावात किती वाढ?

(रुपये प्रति क्विंटल)

पीक वाढ हमीभाव

गहू १५० २४२५

मोहरी ३०० ५९५०

करडई १४० ५९४०

मसूर २७५ ६७००

चणा डाळ २१० ५६५०

बार्ली १३० १९८०