भारताला इस्लामिक राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे असा सल्ला यती नरसिम्हानंद यांच्याशी संबंधित वादग्रस्त संस्थेने दिला आहे. हरिद्वारमधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी सध्या जामीनावर असणाऱ्या यती नरसिम्हानंद यांनी याआधी मथुरामध्ये बोलताना हिंदूंना आगामी दशकांमध्ये देशात हिंदू टिकवायचे असतील तर जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला असं म्हणाले होते.
अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे की, “भारतात लोकशाही असून हिंदू बहुसंख्यांक आहेत. पण नीट योजना आखल्याप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म देत मुस्लीम त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत,” असं यती सत्यदेवानंद म्हणाले आहेत. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात तीन दिवसांची धर्मसंसद आयोजित करण्यात आली असून पहिल्या दिवशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
“म्हणूनच आमच्या संस्थेने हिंदूंना भारत इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचं असेल तर जास्त मुलांना जन्म देण्यास सांगितलं आहे,” असं यती सत्यदेवानंद सरस्वती म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी दोनपेक्षा जास्त मुलं असणं आपल्या राष्ट्रीय धोऱणाच्या विरोधात नसेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “फक्त दोनच मुलं जन्माला घाला असं सांगणारा कोणताही कायदा आपल्या देशात नाही”.
या धर्मसंसदेत यती नरसिम्हानंद, अन्नपूर्णा भारती आणि देशभरातील इतर अनेक संत साधू उपस्थित असणार आहेत. हिमाचल प्रदेश पोलिसांनी कार्यक्रमात प्रक्षोभक भाषा वापरु नये अशी नोटीस पाठवली आहे. नरसिम्हानंद यांना डिसेंबर महिन्यात हरिद्वारमध्ये आयोजित धर्मसंसेदत प्रक्षोभक वक्तव्यं केल्याप्रकरणी अटक केली होती. नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.