केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ जाहिरात मोहिमेच्या ब्रॅंड अॅम्बेसिडरपदी अखेर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनेता आमीर खान अतुल्य भारत मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसिडर होता. मात्र त्यांच्याशी करण्यात आलेला करार संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपनीने त्याचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला. आमीर खान याने असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे या कराराचे नुतनीकरण करण्यात नाही, अशी चर्चा होती.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’ मोहिमेच्या ब्रॅंड अॅम्बेसिडरपदासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंताची यादी तयार केली होती. त्यामध्ये बॉलिवूडसोबतच क्रीडा आणि इतर क्षेत्रांचाही समावेश आहे. या नावांमधूनच अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांचे नाव निश्चित करण्यात आले. या पदासाठी अमिताभ बच्चन यांचे नाव पहिल्यापासूनच चर्चेत होते. त्यांची निवड निश्चित मानण्यात येत होती. या जाहिरात मोहिमेमध्ये एखादी महिला असावी, यावर पर्यटन मंत्रालय विचार करीत होते. त्या दृष्टिनेच प्रियांका चोप्राची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा म्हणाले होते की, ‘अतिथी देवो भव’ या मोहिमेसाठी मॅक् कॅन वर्ल्डवाइड या एजन्सीशी पर्यटन विभागाने करार केला होता. या एजन्सीने आमीर खानला ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून निवडले होते. मॅक् कॅनशी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात दोन कोटी ९६ लाख रुपयांचा हा करार झाला होता. तो आता संपुष्टात आला आहे.