भारतीय हद्दीतील देसपांग खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या आपल्या सैन्याला मागे घेण्यासाठी निश्चित कालावधी देण्यास गुरुवारी चीनने नकार दिला आहे. मात्र  दोन्ही देशांमधील संबंध सध्या तणावाचे वाटत असले तरी वाटाघाटाद्वारेच त्यावर तोडगा काढण्यात येईल, असा विश्वासही चीनने व्यक्त केला.
चीनी सैन्य भारतीय हद्दीतून माघारी केव्हा घेणार याप्रश्नावर पत्रकारांशी बोलताना चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच चीनचे सैन्य आपल्या हद्दीतच गस्त घालत आहेत. दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या वादावर निश्चित दिशेने चर्चा सुरू  आहे आणि योग्य तो तोडगा निघेल, असा विश्वाही युनयिंग यांनी व्यक्त केला.
भारताची भूमिका संदिग्ध
चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेली नाही, आम्ही आमच्याच प्रदेशात आहोत आणि उभय देशांतील सीमेबाबतचा वाद कायम आहे. असे असताना भारतीय प्रसिद्धी माध्यमे अतिरंजित बातम्या पसरवित आहेत आणि विरोधी पक्षही त्यात तेल ओतत आहेत. या पाश्र्वभूमीवर भारत सरकार मौन बाळगून संदिग्धपणे वागत असल्याने उभय देशांतील संबंधांना बाधा आली आहे, अशी टीका चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या दैनिकाने केली आहे.
चीनकडून कोणताही घुसखोरी झाली नसून दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शांततेत चर्चा सुरु असल्याचे या दैनिकाने अग्रलेखात म्हटले आहे. त्यामुळे अशा बातम्या आणि विरोधाबाबत भारत सरकारने मौन बाळगल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संदिग्धता निर्माण झाली असून त्याचा परिणाम उभय देशांतील संबंधावर होणार असल्याचेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
अमेरिकेचा सल्ला
भारत आणि चीन सीमावादात परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्यास आमचा पाठिंबा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनच्या घुसखोरीबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते पॅट्रिक व्हेनट्रेल म्हणाले की, दोन्ही देशांनी यावर सामंजस्याने तोडगा काढावा यासाठी अमेरिकेचा पाठिंबा आहे. दोन्ही देशांमध्ये चार हजार कि.मी. क्षेत्रावरून वाद असल्याचे भारताने नमूद केले आहे. मात्र आम्ही अरुणाचल प्रदेशातील दोन हजार कि.मी. अंतराचे बंधन पाळले असून तो भाग दक्षिण तिबेट असल्याचा दावा चीनने केला आहे.