चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या  घटनांची शक्यता फेटाळता येणार नाही, असे मत संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी व्यक्त केले आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या सीमा संरक्षण सहकार्य कराराच्या पाश्र्वभूमीवर असे पेचप्रसंग आता तातडीने सोडवले जातात असेही ते म्हणाले. भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धाच्या स्मरणार्थ आयोजित विजय दिनाच्या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते.
भारताच्या पाच नागरिकांना चीनच्या लष्कराने ते चुमर भागात गुरे चारण्यासाठी गेले असताना ताब्यात घेतले व नंतर ध्वज बैठकीनंतर पुन्हा भारताच्या ताब्यात दिल्याची घटना अलीकडे घडली आहे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, पीपल्स लिबरेशन आर्मीने नागरिकांना पकडले होते जवानांना नाही, तसेच हा वाद सामोपचाराने मिटला आहे. सीमा प्रश्नी चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, सीमावादावर समाधानकारक तोडगा निघेपर्यंत चर्चा व अधिकृत यंत्रणांच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारत-चीन सीमा प्रश्न सोडवण्यात आम्ही चमत्कार करून दाखवू शकत नाही.
भारत व चीन यांच्या खास प्रतिनिधींच्या दरम्यान सध्या सीमा प्रश्नावर चर्चा सुरू आहे. संरक्षण मंत्री अँटनी यांनी सांगितले की, लोकांनी आमच्याकडून चमत्कारांची अपेक्षा करू नये. दोन्ही बाजूंनी हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे ठरवले आहे. सीमेवर शांतात ठेवणे हे आमचे धोरण आहे तरीही घुसखोरीच्या घटनांची शक्यता फेटाळता येत नाही. दोन्ही देशांनी सामोपचाराने त्यावर तोडगा काढला पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incursions by chinese troops cannot be ruled out a k antony