Champions Trophy 2025 Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स करंडक २०२५ स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ गडी राखून पराभव केला. भारताने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. रोहित शर्माने ७६ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला हा विजय मिळवून दिला. रोहितला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. रोहितने त्याच्या खेळीद्वारे व नेतृत्वकौशल्याने सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. दरम्यान, रोहितवर टीका करणारे, त्यांच्या फिटनेसवर, खेळावर नैतृत्वकौशल्यावर प्रश्न विचारणाऱ्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केलं जात आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी देखील रोहितला काही दिवसांपूर्वी त्याच्या फिटनेसवरून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रोहितने त्याच्या फलंदाजीने शमा मोहम्मद यांच्यासह सर्व टीकाकारांना उत्तर दिल्यानंतर भाजपाने शमा मोहम्मद यांना चिमटा काढला आहे.

“अनफिट समझा क्या? सुपरफिट है मैं!” अशा शब्दांत भाजपाने काँग्रेसला चिमटा काढला आहे. रोहितने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीद्वारे काँग्रेसला चोख उत्तर दिलंय, असं भाजपाने म्हटलं आहे. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी गेल्या आठवड्यात रोहित शर्माबद्दल एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की “तो लठ्ठ आणि वाईट कर्णधार आहे. त्यानंतर शमा मोहम्मद यांच्यावर समाजमाध्यमांवर जोरदार रोष पाहायला मिळाला. मात्र आता रोहितने त्याच्या फिटनेसचं व कौशल्याचं दर्शन घडवत चॅम्पियन्स करंडक उंचावला आहे.

शमा मोहम्मद काय म्हणाल्या होत्या?

“रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधारपदाची संधी मिळाली.” असं वक्तव्य शमा मोहम्मद यांनी केलं होतं. “एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा खूप लठ्ठ आहे. त्याने वजन घटवण्याची आवश्यकता आहे. तसेच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे”, अशा शब्दांत शमा मोहम्मद यांनी रोहितच्य फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, रोहितची धडाकेबाज खेळी व भारताच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजयानंतर, नेटीझन्सनी शमा मोहम्मद यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी एक्सवर एक पोस्ट करत भारतीय क्रिकेट संघ आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे.

शमा मोहम्मद यांच्याकडून रोहित शर्मा व टीम इंडियाचं कौतुक?

शमा मोहम्मद यांनी म्हटलं आहे की “चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजयाबद्दतल भारतीय संघाचं अभिनंदन. भारतीय संघाचं नेतृत्व करणारा व अंतिम सामन्यात ७६ धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला सलाम. यासह श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्या चिवट खेळी देखील महत्त्वाच्या होत्या. त्यामुळेच आप विजयी झालो.”

Story img Loader