स्वातंत्र्य दिन साम्राज्यवादातून प्रजासत्ताकवादाकडे नेणारा दिन आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात डी. वाय. चंद्रचूड बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. भारतीय ध्वज म्हणजे घटनात्मक मूल्ये जपण्याचे प्रतिक आहे. हे आपल्या सामूहिक वारशाचे प्रतीक आहे. साम्राज्यवादातून प्रजासत्ताकाकडे नेणारे हे स्वातंत्र्य आहे, यासाठी लोकशाहीचा आधार घेण्यात आला आहे”, असंही चंद्रचूड म्हणाले.

“आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी राष्ट्रीय प्राधान्यक्रम ठरवले आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले”, असंही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरील भाषणात प्रादेशिक भाषांचा गौरव केला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही मोदींच्या याबाबीत प्रशंसा केली. “मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यावर चंद्रचूड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा ऑपरेटिव्ह भाग याचिकाकर्त्याच्या भाषेत अनुवादित करण्याचा निर्णय घेतला आहे.

“पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. आत्तापर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे ९,४२३ निकाल प्रादेशिक भाषांमध्ये आणि ८,९७७ हिंदीत अनुवादित झाले आहेत. आम्ही आत्तापर्यंत आसामी, बंगाली, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूचा समावेश केला आहे. आमचा प्रयत्न आहे की SC चे सर्व ३५ हजार निवाडे, नागरिकांना प्रत्येक भाषेत उपलब्ध असावेत. यामुळे आमच्या न्यायालयांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर सुलभ होईल कारण जर निकाल प्रादेशिक भाषेत नसतील तर तुम्ही प्रादेशिक भाषेत युक्तिवाद करू शकता असे म्हणण्याचा काय उपयोग आहे?” असं चंद्रचूड म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence marks transition from imperialism to says cji dy chandrachud sgk