जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आलं आहे. स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी IQAir नं हा सर्वे केला असून त्यानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’ च्या निष्कर्षांनुसार १३४ देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कशी मोजण्यात आली प्रदूषित हवा?

जगभरातील विविध देशांमधल्या हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम २.५ चं प्रमाण हे मापक वापरण्यात आलं होतं. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात ५४.४ माक्रोग्रॅम पीएम २.५ चं केंद्रीकरण झाल्याचं निदर्शनास आलं. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ७९.९ मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ७३.७ मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतकं आढळून आलं.

सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांत ४२ भारतीय

दरम्यान, एकीकडे सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी असताना दुसरीकडे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल ४२ शहरांचा समावेश आहे. जहभरातलं सर्वाधिक प्रदूषत शहर बिहारमधील बेगुसराय ठरलं असून त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.

२०२३मध्ये बेगुसरायमध्ये प्रती क्युबिक मीटर पीएम २.५ चं प्रमाण ११८.९ मायक्रोग्रॅम इतकं आढळून आलं. गेल्या वर्षी हेच प्रमाण तब्बल १९.७ इतकं कमी होतं. गुवाहाटीमद्ये हेच प्रमाण २०२२ मधील ५१ वरून २०२३ मध्ये तब्बल १०५.४ मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतकं वाढल्याचं आढळून आलं आहे. दिल्लीत हेच प्रमाण याच काळात ८९.१ वरून ९२.७ मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतकं वाढल्याचं दिसून आलं आहे.

भारतातील इतर शहरे कोणती?

बेगुसराय, गुवाहाटी आणि दिल्लीव्यतिरिक्त ग्रेटर नोएडा (११), मुझफ्फरनगर (१६), गुरगाव (१७), अराह (१८), दादरी (१९), पाटणा (२०), फरिदाबाद (२५), नोएडा (२६), मीरत (२८), गाझियाबाद (३५) आणि रोहतक (४७) या शहरांचा या यादीत समावेश आहे.

कशी गोळा केली माहिती?

दरम्यान, या सर्वेक्षणासाठी नेमकी माहिती कशी गोळा करण्यात आली, याबाबतही IQAir कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या सर्वेक्षणासाठी १३४ देशांमधील ७ हजार ८१२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या तब्बल ३० हजार एअर स्टेशन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India 3rd most polluted country in world iqair finds 42 cities in top 50 are indian spl