संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या रशिया दौऱ्यात वाटाघाटी
रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी भारतासाठी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आणि अणू पाणबुडी घेण्याच्या दृष्टीने वाटाघाटी केल्या आणि उभय देशांतील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
भारत रशियाकडून ‘एस-४०० ट्राएम्फ’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकत घेण्याचा तसेच आणखी एक अणू पाणबुडी भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जाणार आहेत. त्या भेटीत या कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.
रशियाने आजवर ही प्रणाली केवळ चीनलाच विकली आहे. चीनने त्यासाठी ३ अब्ज डॉलर मोजले आहेत. जर मोदी यांच्या भेटीत करार झाला तर भारत ही प्रणाली घेणारा दुसरा देश असेल. रशियन सुरक्षा दलांमध्ये २००७ पासून ही प्रणाली कार्यान्वित आहे. भारताकडे यापूर्वीच असलेल्या ‘एस ३००’ या रशियन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची ही सुधारित आवृत्ती आहे. ‘एस-४०० ट्राएम्फ’ शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच ४०० किलोमीटर अंतरावर नष्ट करू शकते. ती आपल्या दिशेने येणाऱ्या लक्ष्यांच्या दिशेने तीन प्रकारची वेगवेगळ्या क्षेपणास्त्रे डागू शकते. एकाच वेळी ३६ लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.
भारताने रशियाकडून २०१२ मध्ये चक्र ही अणू पाणबुडी भाडेतत्त्वावर घेतली होती. तशी आणखी एक पाणबुडी घेण्याची योजना आहे. रशियाच्या कामोव्ह-२२६टी या प्रकराच्या २०० हेलिकॉप्टर्सचे भारतात उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे. शिवाय सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्ती संदर्भातही वाटागाटी झाल्या. या करारांना मोदींच्या मॉस्को भेटीत अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा