नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यासाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीची बैठक १९ डिसेंबरला दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी ‘इंडिया’च्या सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.

पाच विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर पहिल्यांदाच ‘इंडिया’तील नेते एकत्र येत असून दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी एक दिवस आधीच दिल्लीत दाखल होणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशीही काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधला असून त्यांनीही बैठकीमध्ये सहभागी होण्यास होकार दिला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल  तसेच, अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी  

विधानसभा निकालानंतर ‘इंडिया’तील वर्चस्वाला धक्का लागला असला तरी, काँग्रेस २८ डिसेंबर रोजी नागपूरमधील जाहीर सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्याआधी ‘इंडिया’च्या घटक पक्षांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्यामुळे काँग्रेसने बैठकीसाठी पुढाकार घेतल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. 

बैठकीचा अजेंडा काय?

* विधानसभा निवडणुकांमध्ये सप, माकप या इंडियातील घटक पक्षांसाठी काँग्रेसने जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आदी नेते नाराज झाले होते. त्यांच्या शंकांचे निरसन करून पुन्हा ‘इंडिया’ला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

* मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांची संयुक्त जाहीर सभा आयोजित करण्याचा निर्णय झाला होता. त्यावरही निर्णय घेतला जाईल. * विविध राज्यांतील जागावाटपावरही सखोल चर्चा केली जाणार आहे. विशेषत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित करावे लागणार आहे.

Story img Loader