नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी व ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ‘दिल्लीचे पॅरिस करण्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले होते पण, दिल्लीची काय दुरवस्था केली हे बघा’, असे म्हणत राहुल गांधींनी मंगळवारी ‘आप’ सरकारविरोधात चित्रफीत प्रसारित केली. या चित्रफितीमध्ये शहरात ठिकठिकाणी पडलेला कचरा, नाल्यांची-रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यात आली आहे. नागरी सुविधांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. उत्तर-पूर्वेतील सीलमपूरमध्ये सोमवारी झालेल्या पहिल्या प्रचारसभेतही राहुल गांधींनी दिल्लीतील प्रदुषण, पायाभूत सुविधांचा अभाव अशा मुद्द्यांवरून केजरीवाल सरकारवर तीव्र टीका केली होती.

हेही वाचा >>> संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर

मात्र, राहुल गांधींच्या टिकेवर केजरीवालांनी उपहासात्मक टिप्पणी केली. ‘राहुल गांधींना काँग्रेस पक्ष वाचवायचा आहे, मला देश वाचवायचा आहे’, असा टोमणा केजरीवालांनी मारला. ‘याहून अधिक राहुल गांधींवर मी बोलणार नाही’, असेही केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’च्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून त्याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ‘आप’ व काँग्रेस दोन्ही पक्ष ‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष असले तरीही, दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी आघाडी करण्यास नकार दिला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या आघाडीचा लाभ न झाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय ‘आप’ तसेच काँग्रेसने घेतला. त्यातच राहुल गांधींनी थेट केजरीवालांनाच लक्ष्य केल्यामुळे दोन्ही पक्षांतील दरी वाढू लागली आहे. शिवाय, ‘इंडिया’ आघाडीतील इतर घटक पक्षांनी ‘आप’ला पाठिंबा दिल्यामुळे विरोधकांच्या या आघाडीतील मतभेदही टोकाला गेल्याचे दिसू लागले आहे.

Story img Loader