एकेकाळी भारताचा सर्वात जवळचा मित्र रशिया होता. पण मागच्या काहीवर्षात भारत-अमेरिका मैत्री दृढ झाल्यामुळे भारत-रशिया संबंधात काहीसा दुरावा निर्माण झाला. भारत-रशियासंबंध आज पूर्वीसारखे नसले तरी आजही भारत रशियाच्याजवळच्या मित्रांपैकी एक आहे. रशियाच्या जवळच्या पाच मित्र देशांमध्ये भारताचा समावेश होतो. मॉस्कोमधील एका थिंक टँकने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
रशियाची पाकिस्तानबरोबर जवळीक वाढत चालली असली तरी अजूनही रशियाला पाकिस्तानबद्दल तितका विश्वास वाटत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रशियातील एकमेव बिगर सरकारी संस्था लवादा सेंटरने हे सर्वेक्षण केले आहे. २०१७ साली केलेल्या सर्वेक्षण चाचणीचा अहवाल आता २०१८ मध्ये समोर आला आहे.
रशियन नागरिक बेलारुसला आपला सर्वात जवळचा मित्र मानतात. त्यानंतर चीन, कझाकिस्तान, सीरिया आणि भारताचा नंबर लागतो. भारत रशियाच्या जवळचा मित्रांपैकी एक असला तरी चीन रशियाच्या अधिक जवळ आहे. रशियन नागरिकांना चीनबद्दल भारतापेक्षा जास्त आपुलकी, विश्वास वाटतो. काही आठवडयांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये एक अनौपचारिक परिषद झाली. या बैठकीमुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल.
भारताने सुरुवातीपासूनच रशियाकडून मोठया प्रमाणात शस्त्र खरेदी केली आहे. ८०-९० च्या दशकात भारत शस्त्रास्त्रांसाठी पूर्णपणे रशियावर अवलंबून होता. पण आता भारताने अमेरिका, फ्रान्स आणि इस्त्रायल या देशांकडून शस्त्रास्त्र खरेदी वाढवली आहे. भारताच कल अमेरिकेकडे झुकल्यापासून भारत-रशिया संबंधात दुरावा येण्यास सुरुवात झाली.