पंतप्रधान मनमोहन सिंग रशियासोबत होणा-या वार्षिक बैठकीसाठी रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. आपल्या भेटीत आज (सोमवार) पंतप्रधान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दोन्ही देशांच्या संबंधांबाबत आणि विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करणार आहेत.
भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील आणि संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान पत्रकार परिषद घेणार आहेत.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रशिया भेटीत विविध करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित असल्या तरी कुडनकुलमसंदर्भात काही करार होण्याची शक्यता फार धूसर आहे. सदर करार व्यावसायिक पातळीवर झालेला असल्यामुळे त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते.  मात्र, मनमोहन सिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अन्य मुद्दय़ांवर पाच करार होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे रविवारी येथे आगमन झाले.  संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक तसेच लोकांचा परस्परांशी संवाद आदी माध्यमांतून रशियासमवेत संबंध दृढ करण्यास खूप मोठा वाव आहे. रशियासमवेत आमचे संबंध अनन्यसाधारण आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.