मद्यसम्राट विजय मल्या यांना भारतात पाठविण्यास ब्रिटनने नकार दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आता ‘इंटरपोल’कडे मल्यांविरोधात वॉरण्ट जारी करण्याची मागणी केली आहे.
मल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस मिळविण्यासाठी ईडीने सीबीआयला पत्र लिहिले आहे. भारतातील ‘इंटरपोल’ वॉरण्टची अंमलबजावणी करणारी प्रमुख संस्था म्हणून सीबीआय काम पाहते.
एकदा रेड कॉर्नर नोटीस जारी झाली की ‘इंटरपोल’ला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी करता येते.
दरम्यान आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना भारतात पाठवण्यास ब्रिटनने नकार दिल्यामुळे, त्यांना तेथून परत आणण्यासाठी काय पावले उचलावीत याबाबत सक्तवसुली संचालनालयाच्या ‘सल्ल्याची’ आपण वाट पाहात आहोत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. ब्रिटनच्या कायद्यानुसार आम्ही मल्या यांना हस्तांतरित करू शकत नाही, तथापि त्यांच्या प्रत्यार्पणाबाबत भारताच्या विनंतीबद्दल भारतीय उच्चायुक्तालयाशी चर्चा केली जाऊ शकते, असे ब्रिटनने सांगितले असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. आता पुढे काय करायचे याबाबत सक्तवसुली संचालनालयाच्या सल्ल्याची आम्ही वाटत पाहात आहोत, असे ते म्हणाले.

Story img Loader