सरबजित सिंग या भारतीय कैद्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याने त्याची सुटका करावी, अशी मागणी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे सोमवारी केली. हेरगिरीच्या आरोपांवरून पाकिस्तानच्या कोट लखपत या तुरुंगात असणाऱ्या सरबजितवर शुक्रवारी ६ कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५९ वर्षीय सरबजितवर सध्या जिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या जिवाला असलेला धोका कायम आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
सरबजितच्या प्रकृतीला असलेला धोका लक्षात घेता पाकिस्तान सरकारने सहानुभूतीपूर्वक तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्याची सुटका करावी व त्यास आमच्याकडे सोपवावे, अशा आशयाचे पत्रक परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केले. सरबजितवरच्या कुटुंबीयांप्रमाणेच सरकारलाही त्याच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे, आम्हीही त्याच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. पाकिस्तानला त्याची सुटका करायची नसेल तर अत्याधुनिक उपचारांसाठी त्याला भारतात पाठवावे, अथवा पाकिस्तानात त्यांना आमच्याकडून काही वैद्यकीय मदत हवी असल्यास तसे कळवावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावरील उपचारात हयगय करू नये, पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या भारतीय कैद्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णपणे पाकिस्तानची आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
भवितव्य अधांतरी
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १९९० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याच्या संशयावरून सरबजितला अटक करण्यात आली असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरबजितचा दयेचा अर्ज पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय तसेच तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी फेटाळून लावला आहे. सरबजितने शेतात काम करताना चुकून सीमारेषा पार केली तसेच त्याला गैरसमजातून अटक करण्यात आल्याचा दावा त्याचे कुटुंबीय पहिल्यापासून करीत आहेत.
सरबजितची सुटका करा
सरबजित सिंग या भारतीय कैद्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याने त्याची सुटका करावी, अशी मागणी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे सोमवारी केली. हेरगिरीच्या आरोपांवरून पाकिस्तानच्या कोट लखपत या तुरुंगात असणाऱ्या सरबजितवर शुक्रवारी ६ कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५९ वर्षीय सरबजितवर सध्या जिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या जिवाला असलेला धोका कायम आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
First published on: 30-04-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India asks pakistan to release sarabjit