भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी व्हिसाअर्जात म्हटल्याप्रमाणे मोलकरणीला वेतन न दिल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर १३ जानेवारीला आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता वाढल्याने आता भारताने अमेरिकी दूतावासाच्या आवारात व्यापारी-व्यावसायिक व्यवहारांना १६ जानेवारीपासून बंदी घातली आहे.
अमेरिकन कम्युनिटी सपोर्ट असोसिएशन, रेस्टॉरंट, व्हिडिओ क्लब, बाउलिंग अॅले, स्वीमिंग पूल, स्पोर्ट्स पूल, ब्युटी पार्लर व जिम यांच्या नावाखाली जे व्यवहार चालतात ते अमेरिकी दूतावासाने बंद करावेत असे आदेशात म्हटले आहे. तेथील व्यावसायिक व्यवहारांची कर विवरणपत्रे भारतीय अधिकाऱ्यांना दाखवावीत असेही कळवण्यात आले आहे.
राजनैतिक दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांना अशा व्यावसायिक सुविधा देणे म्हणजे १९६१च्या राजनैतिक संबंधविषयक व्हिएन्ना कराराच्या कलम ४१ (३)चे उल्लंघन आहे. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या वाहनांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना दंड केला जाईल असेही भारताने स्पष्ट केले आहे. ज्यांनी वाहन क्रमांकासाठी अर्ज केला आहे अशा एएफ (अॅप्लाइड फॉर) वाहनांवर कारवाईची शक्यता आहे.
दरम्यान ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातमीत असे म्हटले आहे की, अमेरिका व भारत यांच्यातील संबंधात देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेचे प्रकरण हाच कळीचा मुद्दा बनला आहे. देवयानी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले तर या दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा