पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. एरिना स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. तसंच त्यांनी या भाषणात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध कसे आहेत त्यावर भाष्य केलं.
काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?
एक काळ असा होता की भारत ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन सी दाखवले जायचे. भारत आणि ऑस्ट्रेलियातले तीन सी आहेत. कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी. नंतर म्हटलं गेलं भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध थ्री ‘डी’ वर आधारीत आहेत. डेमोक्रसी, डायस्पोरा आणि दोस्ती. त्यानंतर काहींनी हेही सांगितलं की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन ईवर आधारीत आहेत. एनर्जी, इकोनॉमी आणि एज्युकेशन.. कधी सी, कधी डी, कधी ई. वेगवेगळ्या काळात या गोष्टी कदाचित खऱ्याही राहिल्या आहेत. पण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक संबंधांचा विस्तार यापेक्षा खूप मोठा आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तुम्हाला माहित आहे का? या सगळ्या संबंधांचा सर्वात मोठा आधारस्तंभ काय आहे? तो आधार आहे म्युच्युअल ट्रस्ट आणि म्यु्च्यअल रिस्पेक्ट. यामागची खरी ताकद आहे ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय. ऑस्ट्रेलियातले अडीच कोटींहून जास्त नागरिक हे या मागची ताकद आहे.
आपल्यामध्ये भौगोलिक अंतर नक्की आहे, मात्र हिंद महासागर आपल्याला एकमेकांमध्ये जोडतो. आपल्या जीवनशैली वेगवेगळ्या आहेत. मात्र योगाही आता आपल्याला जोडतो. क्रिकेटशी तर आपल्याला ठाऊक नाही आपण कधीपासून जोडले गेलो आहोत. मात्र आता टेनिस आणि सिनेमाही आपल्याला जोडत आहेत. भारतात जेवण तयार करण्याच्या शेकडो पद्धती आहेत. मात्र आता मास्टरशेफ आपल्याला जोडतो आहे यात काहीही शंका नाही असंही मोदींनी म्हटलं आहे.
आपले सण आणि उत्सव वेगवेगळे साजरे केले जात असतील. पण दिवाळीच्या रोषणाईने आपण जोडले गेलो आहोत. भारतात भाषा वेगवेगळ्या बोलल्या जातात पण आपण जोडले गेलो आहोत मल्याळम, तेलगु, हिंदी अशा विविधा भाषा शिकवणाऱ्या विविध शाळांमुळे. ऑस्ट्रेलियातले लोक हे इतक्या विशाल हृदयाचे आहेत की त्यांनी भारताची ही विविधता स्वीकारली आहे. त्यामुळेच पॅरामाटा स्क्वेअर हा कुणासाठी परमात्मा चौक होतो. तर हॅरिस पार्क अनेकांसाठी हरिश पार्क होतो. मी असंही ऐकलं आहे की हॅरीस पार्क मध्ये चाट आणि जयपूर स्वीट्सची जिलबी मिळते. माझी तुम्हाला विनंती आहे की माझे मित्र पंतप्रधान यांनाही तिथे घेऊन जा. खाण्याची गोष्ट निघाली आहे तर लखनऊचं नाव येणारच. मी ऐकलं आहे सिडनीजवळ लखनऊही आहे. तिथे चाट मिळतो का मला माहित नाही. दिल्ली स्ट्रीट, बॉम्बे स्ट्रीट, कश्मीर अॅव्हेन्यू असे किती तरी रस्ते तुम्हाला भारताशी जोडून ठेवतात हे मला ठाऊक आहे. आता ग्रेटर सिडनीमध्ये इंडिया परेडही सुरु होणार आहे असंही सांगितलं गेलं. तुम्ही सगळ्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही थाटामाटात साजरा केलात हे मला माहित आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
आपल्या भाषणात पॅरामॅटा शहराचे लॉर्ड मेयर म्हणून समीर पांडे यांची निवड झाल्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. पॅरामाटामध्ये हे सगळं घडताना ही माहिती समोर आली आहे की पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात नयन सी सैलानी यांच्या नावाने सैलानी अॅव्हेन्यू निर्माण करण्यात आला आहे. सैलानी पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियासाठी लढताना शहीद झाले होते.