अत्यंत धोकादायक अशा इसिस या दहशतवादी संघटनेसह त्यांच्या सहयोगी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इराक आणि सीरियामध्ये अनेक दहशतवादी हल्ले करून लोकांना ठार मारणाऱ्या या संघटनेवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आहे.
भारतातील युवकांना फितवून त्यांना प्रतिगामी करण्यात इसिसने घेतलेला पुढाकार देशासाठी अत्यंत धोकादायक ठरण्याची चिन्हे होती. कारण हे युवक भारतात परतल्यानंतर देशाच्या सुरक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होणे सहज शक्य होते, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.  
याद्वारे, ‘द इस्लामिक स्टेट/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हण्ट/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया/ दैश आणि त्यांच्या अन्य सर्व संघटना भारतामध्ये आता बेकायदेशीर ठरविण्यात आल्या आहेत.
‘जागतिक जिहादा’चे आपले उद्दिष्ट साधण्यासाठी इसिसची संघटना इराक आणि शेजारील देशांमध्ये सक्रिय असून ते युवकांना प्रशिक्षित करीत आहेत. विविध देशांमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे स्वबळावर उलथवून टाकण्यासाठीच जागतिक जिहादाचे उद्दिष्ट त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.  
भारतासह विविध देशांतील युवकांची आपल्या संघटनेत भरती करून त्यांना धर्माध बनविण्याचे उद्दिष्ट इसिसने ठेवले असून निरपराध नागरिक तसेच सुरक्षा दलाच्या सैनिकांनाही ठार मारून दहशतवाद पसरविण्याची त्यांची योजना असते, असे केंद्र सरकारचे ठाम मत बनले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
अन्य कारवाया
इसिस संघटनेत सामील होण्यासाठी मुंबईतील चार युवक गेल्या वर्षीच्या मे महिन्यात इराक-सीरियात गेले होते. त्यांच्यापैकी एक जण परतला, तर इतर तिघांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. याखेरीज, इसिस संघटनेचे समर्थन करणारे लेखन ट्विटरवर केल्याप्रकरणी बंगळुरूच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यासही डिसेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती.
 इसिस संघटनेतच सहभागी होण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून हैदराबाद येथील एका इसमास सीरियात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.