सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. यामुळे तिथे जवळपास हजारो भारतीय नागरिक अडकले आहेत. या गृहयुद्धातून आपल्या भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याकरता भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत ट्वीट केलं असून सुमारे ५०० भारतीय सुदान बंदरावर पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले.
“सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. सुमारे ५०० भारतीय सुदा बंदरावर पोहोचले आहेत. काही भारतीय या मार्गावर आहेत. आमची जहाजे आणि विमाने भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सज्ज आहेत. सुदानमधील आमच्या सर्व बांधवांना मदत करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत”, असं ट्वीट जयशंकर यांनी केलं आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी वायुसेनेचे दोन सी-१३० विमान आणि आयएनएस सुमेधा जहाज सौदी अरेबिया आणि सुदानमध्ये पोहोचले आहेत. वायुसेनेचे जहाज सौदी अरेबियाच्या हद्दीत तैनात आहेत. तर, आयएनएसचे सुमेधा जहाज सुदानच्या बंदरगाह येथे पोहोचले आहे.
हेही वाचा >> सुदान संघर्षातून तीन हजार भारतीय नागरिकांची अजूनही सुटका नाही; सध्याच्या परिस्थितीची माहिती जाणून घ्या!
सुदानमधील परिस्थिती चिघळत असल्याने तेथील परदेशी नागरिक आपआपल्या मायदेशी परतत आहेत. विविध देशातील १५० हून अधिक नागरिक शनिवारी सौदी अरेबियात पोहोचले. भारतातील फ्रान्सच्या दूतावासाने ट्वीट करत म्हटलं की, काल रात्री दोन लष्करी विमानांनी भारतीय नागरिकांसह २८ देशांतील ३८८ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
परिस्थिती चिघळली
या संघर्षामुळे तीन हजार भारतीय नागरिक सुदानच्या विविध भागांत अडकले आहेत. तर केरळचे रहिवासी अल्बर्ट ऑगस्टिन (४८) यांचा सुदानमधील गोळीबारात दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. सुदानी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यात अजूनही तोडगा निघण्याचा मार्ग दिसत नाही. यामुळे हे गृहयुद्ध आणखी भडकण्याची चिन्ह दिसत आहेत. सैन्यदलाचे प्रमुख आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष जनरल अब्देल फत्ताह अल-बुऱ्हान यांनी अल् अरेबिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, सर्व योद्ध्यांनी सुदानी नागरिक म्हणून एकत्र बसायला हवे आणि सुदानची आशा आणि जीवन पुन्हा पल्लवित करण्यासाठी योग्य मार्ग काढला पाहिजे. या युद्धामुळे प्रत्येकाचे नुकसानच होणार आहे.
सुदानमधील संघर्ष कशामुळे झाला?
सुदानमध्ये शक्तिशाली अशा निमलष्करी दलाची स्थापना २०१३ रोजी झाली होती. यात मुख्यतः जंजावीड मिलितीस यांचा समावेश आहे, ज्यांनी २००० साली दार्फर युद्धात सुदान सरकारतर्फे सहभाग घेतला होता. निमलष्करी दलाचे नेतृत्व जनरल मोहम्मद हमदान डगलो यांच्याकडे आहे. ज्यांना हेमेदती असेही म्हटले जाते. त्यांच्यावर मानवाधिकारांचे हनन केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.
सुदानमधील भारतीयांसाठी MEA नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
फोन: 1800 11 8797 (टोल फ्री)
91-11-23012113
91-11-23014104
91-11-23017905