Pakistan Government’s Official X Account: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी भारतात पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ला भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर एक्सने हे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने केलेल्या विनंतीनुसार, पाकिस्तान सरकारचे अकाउंट निलंबित करण्यात असून, आता ते भारतातील युजर्ससाठी उपलब्ध नाही.

दरम्यान दहशतवाद्यांना सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने कठोर धोरण स्वीकारले आहे. कालच सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर विविध निर्बंध लादले होते. त्यानंतर आता पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंटही भारतात ब्लॉक करण्याचाही निर्णय घेतला आहे.

सिंधू पाणी करार स्थगित

काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याच्या निर्यणाचा समावेश आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.”

पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश

विक्रम मिस्री यांनी पुढे सांगितले की, “संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात. तसेच पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.”

पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू

मंगळवारी दुपारी, पहलगामपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या बैसरन परिसरात पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. यामध्ये भारतातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ला हा अलिकडच्या काळात काश्मीर खोऱ्यातील सर्वात घातकी हल्ल्यांपैकी एक होता.