नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी निदर्शने आणि घोषणाबाजी करून लढवय्येपणा दाखवणाऱ्या विरोधकांनी मंगळवारी राज्यसभेत सभात्याग करून सत्ताधाऱ्यांसमोर नांगी टाकली. त्यानंतर खोटी माहिती पसरवणाऱ्यांकडे सत्य ऐकण्याची हिंमत नसल्याचा टोला विरोधकांना लगावण्याची पंतप्रधानांना संधी मिळाली. तर सभापती जगदीप धनखड यांनीही सभात्यागावरून विरोधकांवर ताशेरे ओढले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावास बुधवारी राज्यसभेत पंतप्रधानांनी उत्तर दिले. सुमारे दोन तासांच्या भाषणात त्यांनी संविधानावरून काँग्रेसला लक्ष्य केले. २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यास काँग्रेसचा विरोध होता. पण, संसदेत त्यांचे नेते संविधानाची प्रत डोक्यावर घेऊन नाचत आहेत, असा आरोप मोदींनी केला. मोदींनी भाषणामध्ये केलेल्या दाव्यांवर विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेत हस्तक्षेपाची परवानगी सभापतींकडे मागितली. ही मागणी फेटाळली गेल्यानंतर विरोधकांना जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मात्र धनखड यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधकांच्या या कृतीने मोदींना आक्रमक होण्याची संधी मिळाली. अख्खा देश तुमच्या कृतीकडे पाहात आहे. तुमच्याकडे सत्य पचवण्याची क्षमता नाही.

हेही वाचा >>>“वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याने…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हेमंत सोरेन, JMM-काँग्रेसवर हल्लाबोल

तुम्ही सभागृहात उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देत आहे. पण, ती ऐकण्याचीदेखील हिंमत तुमच्यामध्ये नाही, असा टोला मोदी यांनी लगावला. लोकांनी रालोआला सलग तिसऱ्यांदा सत्ता दिली आहे. लोकांचा हा निर्णय विरोधकांना पचवता आलेला नाही, असेही मोदी म्हणाले. तर सभापतींनीही विरोधकांना खडे बोल सुनावले. ‘विरोधकांनी बहिष्कार टाकून सभागृह सोडले नसून त्यांनी मर्यादा सोडल्या आहेत. विरोधकांनी माझ्याकडे वा मोदींकडे नव्हे तर, संविधानाकडे पाठ फिरवली आहे. हा आमचा नव्हे तर या पदांचा अपमान आहे,’ अशा शब्दांत धनखड यांनी ताशेरे ओढले. मात्र सभात्यागामुळे विरोधकांच्या रिकाम्या आसनांसमोर मोदींना बोलावे लागले. सभात्यागाचे खरगेंनी संसदेच्या आवारात बोलताना समर्थन केले. संघानेच संविधानाला विरोध केला होता. त्यांनी डॉ. आंबेडकर आणि नेहरूंच्या प्रतिकृती जाळल्या होत्या, अशा शब्दांत खरगेंनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

संविधान म्हणजे केवळ पुस्तक नव्हे, ती जीवनप्रणाली आहे. विरोधक आत्मपरीक्षण करतील अशी अपेक्षा आहे.- जगदीप धनखड, सभापती, राज्यसभा

भाषणामध्ये पंतप्रधान मोदी खोटे दावे करत होते, म्हणून आम्ही सभात्याग केला. खोटे बोलणे ही त्यांची सवय आहे. – मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा