India Canada Diplomatic Row Tension Over Lawrence Bishnoi Gang : भारत आणि कॅनडामध्ये गेल्या वर्षभरापासून तणावाचं वातावरण आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने वर्षभरापूर्वी केला होता. त्यानंतर भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. यातच कॅनडाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करत भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांचा या प्रकरणाच्या तपासात सहभाग असल्याचा आरोप केला, या आरोपानंतर भारताने एक पत्रक जारी करत कॅनडाने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. त्यापाठोपाठ आता भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले आहे. तसेच कॅनडातील इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावलं आहे.

भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणावादरम्यान संघटित गुन्हेगारीशी संबंधित प्रकरणं हाताळताना, अशा गुन्हेगारांबरोबरच्या कॅनडाच्या भूमिकांवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी कॅनडावर गंभीर आरोप केला की भारतातील गुन्हेगारांची कुख्यात टोळी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यास कॅनडा सरकार तयार नाही. बिश्नोई टोळीतील अनेक गुन्हेगार कॅनडामधील गुन्ह्यांच्या प्रकरणात सामील आहेत.

हे ही वाचा >> Hamas chief Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या लष्करी हल्ल्यात ठार? IDF ने काय सांगितलं?

आम्ही कॅनडाला काही गुन्हेगारांना हद्दपार करण्यास सांगितलेलं, आता त्यांनी कॅनडात उच्छाद माडंलाय : परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की कॅनडातील बिश्नोई टोळीतील अनेक सदस्यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही कॅनडा सरकारशी अनेकदा बातचीत केली आहे. या गुन्हेगारांना भारताकडे सोपवावं अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. प्रतार्पणाच्या २६ विनंत्या गेल्या दशकभरापासून प्रलंबित आहेत. आम्हाला हे सांगायला खूप विचित्र वाटतंय की आम्ही ज्या गुन्हेगारांना कॅनडातून हद्दपार करण्यास सांगितलं होतं, त्यांच्यावर तिथल्या सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, आता त्या गुन्हेगारांनी कॅनडात उच्छाद मांडला आहे. ते आता तिथे गुन्हे करत आहे आणि कॅनडा सरकार त्यासाठी भारताला दोषी ठरवत आहे.

हे ही वाचा >> तीन दिवसांत भारताची २० विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; लंडन-जर्मनीशी कनेक्शन, मोदी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

भारताचं म्हणणं काय?

जयस्वाल म्हणाले, आम्ही वेगवेगळ्या प्रसिद्धी पत्रकांद्वारे आमची भूमिका स्पष्ट केली आहे. सप्टेंबर २०२३ पासून त्यांनी (ट्रुडो) आमच्यावर जे-जे आरोप केले. त्यापैकी एकाही आरोपाप्रकरणी ट्रुडो सरकार पुरावे सादर करू शकलेलं नाही. काल रात्री आम्ही पुन्हा एकदा आमची बाजू मांडणारं प्रसिद्धी पत्रक जारी केली आहे.