पीटीआय, नवी दिल्ली : चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.
याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की असे र्सवकष जनुकीय क्रमनिर्धारण केल्यास देशात उत्परिवर्तित करोना विषाणूंच्या नवीन प्रकारांचा वेळेवर मागोवा व शोध घेणे शक्य होईल. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी विषाणूचा प्रतिबंध करणे आवश्यक असून त्यासाठी उपाययोजना करणे सोपे जाईल. या पत्रात भूषण यांनी अधोरेखित केले, की विषाणू चाचणी, करोना प्रकरणांचा मागोवा, उपचार, लसीकरण व कोविड प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर धोरणात भर देण्यात येणार आहे. देशात सध्या आठवडाभरात १२०० रुग्ण आढळत आहेत. अजूनही जगभरात कोविड-१९ चे आव्हान कायम आहे. कारण जगभरात अजूनही ३५ लाख रुग्णांची दर आठवडय़ाला नोंद होत आहे.
या वर्षी जूनमध्ये आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या करोना प्रतिबंधक वर्तणुकीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ या पत्रात देण्यात आला असून, या विषाणूंच्या नवीन उत्परिवर्तित प्रकारांचा प्रादुर्भाव शोधण्यासाठी संशयित व बाधित प्रकरणांचा लवकर मागोवा, विलगीकरण, चाचणी आणि वेळेवर उपचारांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. या संदर्भात सध्या जागतिक परिस्थितीचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
आज आढावा बैठक जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता आरोग्य मंत्री अन्य देशांमधील करोनाची स्थिती आणि साथ रोखण्यासाठी भारताने केलेल्या तयारीचा आढावा घेतील, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.