पीटीआय, नवी दिल्ली
रंगांचा सण होळी शुक्रवारी देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. लोकांनी एकमेकांवर गुलाल उधळून शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पदार्थांची रेलचेल आणि घरोघरी तसेच रस्त्यांवर रंगीबेरंगी दृश्ये पाहायला मिळाली. बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सकाळी सार्वजनिक वाहतूक बंदच होती. काही ठिकाणी दुपारनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. रमजानची दुसऱ्या शुक्रवारची प्रार्थना आणि होळी सणानिमित्त अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
मुघलकालीन शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणानंतर २४ नोव्हेंबर रोजी उसळलेल्या दंगलीनंतर तणावाची परिस्थिती असलेल्या उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कडेकोट बंदोबस्तात उत्सव शांततेत पार पडला. शुक्रवारी शहरात पारंपरिक ‘चौपई मिरवणूक’ही काढण्यात आली. दुपारी अडीच वाजता मशिदीत शुक्रवारचे नमाज पठणही करण्यात आले.
आदित्यनाथांकडून होलिका भस्माची पूजा
गोरखपूर : होळीनिमित्त गोरक्षपीठाधिश्वर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सकाळी होलिका भस्माची पूजा करून होळी साजरी केली.
दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
नवी दिल्ली : महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे २५,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या साह्याने ३०० संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर होती.
कडेकोट बंदोबस्त, नमाजाच्या वेळेत बदल
संभलच्या शाही जामा मशिदीत कडेकोट बंदोबस्तात शुक्रवारी शुक्रवारची नमाज शांततेत झाली. होळीमुळे शुक्रवारच्या नमाजाची वेळ उलेमा यांनी केलेल्या आवाहनानंतर बदलण्यात आली होती.