योग जिथे जन्मला ती भारतीय भूमी रविवारी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सज्ज झाली होतीच;  याचवेळी हा अनोखा योग साधण्यासाठी जगभरातील अनेक मान्यवरांसह विविध देशांतील आबालवृद्धांनी शीर्षांसन, प्राणायाम  आदी आसनांसह सूर्य नमस्कार घालून नव्या पर्वाला सुरुवात केली, त्याची ही चित्रझलक..

सुसंवादाचे नवे पर्व ; योगदिनी पंतप्रधानांचा विश्वास
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगात शांतता व सुसंवादाच्या नव्या पर्वाची पहाट झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथावरील योग दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सांगितले. किमान ३५ हजार लोकांच्या समवेत त्यांनी योगसाधना केली. रविवारी सकाळी राजपथावर सैनिक, अधिकारी, विद्यार्थी हे योगसाधनेत सहभागी होते. हा राजपथ कधी योगपथ होईल असे वाटले होते का.. असा प्रश्न करून मोदी म्हणाले की, आपण कुठला दिवस साजरा करीत नाही तर मनाला प्रशिक्षण देत आहोत, शांतता व सुसंवादाचे नवे पर्व सुरू झाले आहे. हा मानवी कल्याणाचा कार्यक्रम आहे व संदेश सदिच्छेचा आहे. मोदी यांनी युवकांच्या उत्साहाने योगासने केली. एकूण २१ आसने सर्वानी केली. तीस मिनिटे हा कार्यक्रम चालला. राजपथावर हा कार्यक्रम सकाळी सात वाजता सुरू झाला, त्यासाठी योग मॅटची व्यवस्था करण्यात आली होती.
मोदी यांनी तिरंगी पटका व पांढरा पोशाख परिधान केला होता, साधकांना इंग्रजी व हिंदूीतून सूचना दिल्या जात होत्या व आसने मोठय़ा पडद्यावर दाखवली जात होती. मोदी यांनी योग दिनाच्या कल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. त्यांनीच योग दिनाचा प्रस्ताव गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडला होता. आसने हे योगाचे एक मोठे चित्र आहे, पण त्यात संगीताचा जसा ताल-सूर असतो त्याचेही भान असते, असे ते म्हणाले. रामदेवबाबा यांच्याबरोबर मोदी प्रथम मंचावर उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल नजीब जंग, परदेशी दूतावासांचे अधिकारी उपस्थित होते.
योग दिनाचा कार्यक्रम हा राजकारणाचा भाग नव्हता, तर लोकांच्या कल्याणाचा त्यांच्या फायद्याचा भाग होता, असे मोदी यांनी सांगितले. मुस्लीम गटांनी सूर्यनमस्कार धर्माच्या विरोधात असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी राजपथावर योग दिनात भाग घेतला. १५२ परदेशी दूतांना बोलावण्यात आले होते. काही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १९१ देशात २५१ शहरात योग दिन साजरा करण्यात आला.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लखनौत योग दिन साजरा झाला, नागपुरात नितीन गडकरी, हैदराबादेत आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, बिहारमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, मीरतमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर सहभागी झाले होते.

डेव्हिड कॅमेरून खूश
संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या १७७ राष्ट्रांपैकी एक असणाऱ्या लंडनमध्ये ३० ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी भारतीय व्यायाम प्रकारातील आपल्या जनतेची रूची पाहून खूष झालो असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलियात सूर्यनमस्कार
ऑस्ट्रेलियन नागरिकांसह जवळपास हजारावर लोकांनी योगा दिन साजरा केला. मेलबोर्नमध्ये ५०० लोकांनी सूर्यनमस्कारासह विविध आसने केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश असलेली चित्रफीतही दाखविण्यात आली. या वेळी ऑस्ट्रेलियाच्या काही खासदारांनीही सहभाग घेतला.

पाकिस्तानात योग
भारतीय योग प्रशिक्षकाला पाकिस्तानने व्हिसा नाकारल्यानंतर भारतीय दूतावासात योग दिन साजरा झाला. भारतीय अधिकाऱ्यांसह इतर देशांच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला होता.

* व्हिएतनामची राजधानी होनोईमध्ये चार हजार लोकांनी योग पाहण्याचा आनंद घेतला. या ठिकाणी ८०० लोकांनी योगासने केली.
* जपानमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये ५०० जणांनी योगासने केली. तसेच आशियाई देश मलेशिया, फिलिपाइन्स आदी देशांनीही योगासनांमध्ये सहभाग घेतला होता.
* सिंगापूरमधील ५० ठिकाणी दोन तासांच्या या कार्यक्रमात चार हजार लोकांनी सहभाग घेतला होता.

Story img Loader