भारत-चीनदरम्यान सीमाप्रश्नावरून वाद असले तरी त्याचा द्विपक्षीय संबंधावर परिणाम होणार नाही याची खबरदारी दोन्ही देशांनी घ्यायला हवी, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. चीनचे पंतप्रधान केकी यांग १९ मेपासून भारतभेटीवर येत आहेत. त्यापूर्वी चीनने नरमाईचा सूर आळवत द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चीन प्रयत्न करीत असल्याची ग्वाही दिली. सीमाप्रश्नी लवकर तोडगा निघावा या दिशेने प्रयत्न करीत असल्याचे उपपरराष्ट्रमंत्री साँग ताओ यांनी सांगितले.
दोन्ही देशांत अनेक बाबी समान असल्याचे सांगताना मतभेदांच्या मुद्दय़ांपेक्षा समान हिताचे मुद्दे अधिक आहेत. त्यामुळे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी वादाचे मुद्दे आड येऊ न देण्याचे शहाणपण आमच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश कसोशीने प्रयत्न करीत आहेत. याबाबत सकारात्मक प्रगती झाल्याचा दावा त्यांनी केला. चीनच्या पंतप्रधानांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली यावरून महत्त्व ध्यानात येते. त्यानंतर ते पाकिस्तान, स्वित्र्झलड आणि जर्मनीला जाणार आहेत.
भारतभेटीत यांग पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. भारत-चीन संबंधांवर त्यांचे भाषण होणार असून, भारत-चीन उद्योजकांच्या परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या होतील. दौऱ्यात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दोन्ही देशांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील, अशी अपेक्षा ताओ यांनी व्यक्त केली.