पीटीआय, नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सर्वाधिक संघर्षाच्या जागा असलेल्या डेमचॉक आणि डेप्सांग या दोन ठिकाणांहून सैन्यमाघारी पूर्ण झाली असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी बुधवारी दिली. लवकरच या भागामध्ये गस्त सुरू होईल असे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान गुरुवारी दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.
चीनबरोबर गस्तकरार झाल्याची घोषणा भारताने २१ ऑक्टोबरला केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीननेही त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर प्रत्यक्ष ताबारेषेवरील संघर्षाच्या दोन ठिकाणांहून सैन्यमाघारी सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. ही प्रक्रिया २८ किंवा २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असे २५ ऑक्टोबरला सूत्रांनी सांगितले होते. सध्या सैन्यमाघारीनंतरच्या स्थितीच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि गस्तीच्या पद्धतींविषयी निर्णय तेथील कमांडरकडून घेतले जातील. स्थानिक कमांडर पातळीवर ही चर्चा सुरू राहील असे लष्करी सूत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार, भारतीय सैनिकांनी डेमचॉक आणि डेप्सांगमधून आपली लष्करी उपकरणे मागे घेतली आहेत. दरम्यान, भारत आणि चीनची सैन्यमाघारी क्रमबद्ध पद्धतीने होत असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बुधवारीच सांगितले. दोन्ही देशांचे सैनिक कराराचे पालन करत असल्याचे लिन जियान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.