भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून सुरु असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याचे तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याचे मान्य केलं आहे. त्यानुसार सीमेवरील सैन्य मान्य मागे घेण्याची तसेच चौकी हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे देप्सांग पठार आणि देम्चोक या दोन ठिकाणी आता भारतीय सैनिकांना मे २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही देशातील सैन्य अधिकारी उद्या एकमेकांना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात लष्करातील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, की दोन्ही देशांनी या भागातील सैन्यही मागे बोलवलं आहे. तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. आता दोन्ही देशांच्या अधिकारी या भागांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे.

हेही वाचा – भारत चीनमध्ये समझोता; पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत सहमती

ही पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. मात्र, भारतीय सैनिकांना याची पूर्व कल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधकारक आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाचप्रकारची व्यवस्था आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील वादग्रस्त भागांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे लष्काराच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा – चीनने सोडला दोन वादग्रस्त भूभागांवरील दावा? काय आहे भारत-चीन नवा समझोता?

खरं तर मे २०२० पासून भारत आणि चीन सैन्यामध्ये सीमेवर तणाव आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यामुळे २० जवान शहीद झाले होते. तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता. जोपर्यंत चीनबरोबरचे संबंध सामान्य होत नाही तोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होणे अशक्य असल्याचे मत भारताने मांडलं होतं. त्यासाठी भारताने देपसांग आणि डेमचोक भागातून चीनी सैन्याला हटविण्यासाठी दबाव वाढविला होता. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी या भागातून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India china disengagement in ladakhs will be completed by tuesday spb