हवामान बदलासारख्या जगातील बलाढय़ आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत आणि चीन यासारख्या देशांनी महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे, असे सांगतानाच यासंदर्भात आंतरराष्ट्रीय करारावर संमती झाल्याच्या वृत्ताचा ओबामा प्रशासनाने स्पष्ट इन्कार केला.
हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय सहमती करारावर एकमत घेण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. त्याचा ओबामा प्रशासनाने लगेचच इन्कार केला. सध्या चर्चा सुरू असलेल्या हवामान बदलासंदर्भातील नव्या करारातील एक शब्दही अद्याप कागदावर उतरलेला नसून त्यासाठी सिनेटची मंजुरी लागेल किंवा नाही, याबद्दल बोलणे अत्यंत घाईचे ठरेल, असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, यशस्वी आणि प्रभावी जागतिक हवामान करारावर बोलणी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या सर्वच देशांसमोर उभे असलेले हे तगडे आव्हान परतवण्यासाठी अशा चर्चेची फार मोठी मदत लाभेल. चर्चेतून जे समोर येईल, तेच सिनेटसमोर मांडले जाईल, असे  सचिव जोश एर्नेस्ट यांनी सांगितले.

शामळू धोरण नाही
जागतिक हवामान बदलासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावर बराक ओबामा यांचे कधीच शामळू धोरणे नव्हते आणि नाही. सहमती करारासाठी त्यांचे प्रशासन अथक मेहनत घेत आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या परिषदेत यासंदर्भात आघाडीची भूमिका निभावली होती आणि आताही ते त्याच भूमिकेत आहेत; परंतु दिशादर्शक ठरणाऱ्या करारातील प्रमुख तपशील काय असावा, याचा विचार करायचा झाल्यास अद्याप त्यावर एक अक्षरही लिहिले गेलेले नाही.

Story img Loader