पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने हवामान बदलाचा सामना करणाऱ्या पिकांचे वाण विकसित करावेत. या माध्यमातून डाळी, तेलबिया, टोमॅटो आणि कांद्याचे उत्पादन वाढवून दीर्घकालीन किंमत स्थिरता साध्य करावी, अशी आर्थिक पाहणी अहवालाची शिफारस आहे. खाद्यावस्तूंच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे. व्यवसायाभिमुख शेती करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना राहणीमानाच्या वाढत्या खर्चाचे धक्के सहज पेलता येतील. देशातील खाद्यावस्तूंची महागाई काही भाज्या आणि डाळी यांच्यामुळे वाढत असल्याकडे अहवालाने लक्ष वेधले आहे.

प्रतिकूल हवामानासह, खाद्यावस्तू साठवणूक आणि त्यांच्या वाहतुकीचेही आव्हान आहे. यामुळे पुरवठा साखळी तात्पुरती खंडित होऊन भाज्यांच्या भावात वाढ होत आहे. हवामान बदलातही टिकून राहणाऱ्या पिकांच्या वाणांचे संशोधन करावे. डाळी, तेलबिया, टोमॅटो आणि कांद्याचे असे वाण विकसित करून त्यांचे उत्पादन वाढवावे, असे पाहणी अहवालाने सुचविले आहे. विदा संकलन आणि विश्लेषण यंत्रणा भक्कम करण्याची गरज अहवालाने व्यक्त केली आहे.

स्थिर कृषी विकास भविष्याचे आशास्थान

सरासरी ५ टक्के दराने स्थिर कृषी विकास हा देशाच्या ‘जीडीपी’त किमान १ टक्के योगदान देऊ शकतो. कृषी विकासातील प्रगती केवळ देशांतर्गत अन्न सुरक्षा टिकवून ठेवणार नाही तर जागतिक कृषी बाजारपेठेत भारताची भूमिका देखील वाढवेल. कृषी-आधारित उद्याोजकतेची क्षमता लक्षणीय असून जी ग्रामीण आर्थिक विस्तारासाठी उपयुक्त ठरेल. जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम असतानाही, भारताच्या कृषी क्षेत्राने कणखरता दाखवली आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे

शेतकऱ्यांना शेतीच्या उत्कृष्ट पद्धतींचे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यांना रोगप्रतिकारक आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांचे वाण वापरण्यास शिकवावे. डाळी, टोमॅटो आणि कांदा पिकांचे जास्त उत्पादन होणाऱ्या भागात शेतीच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, असेही अहवालात नमूद केले आहे.