Muhammad Yunus Bijing Visit Sparks Tension : काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार व नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस चीनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी केलेल्या काही विधानांची भारतात मोठी चर्चा पाहायला मिळाली. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये चीनच्या व्यापरविषयक हितसंबंधांना जोपासण्यासंदर्भात त्यांनी केलेलं विधान आता बांगलादेशला भोवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारत सरकारने बांगलादेशसाठी भारतीय भूमीवर उपलब्ध करून दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा बांगलादेशच्या निर्यात व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
नेमका काय आहे निर्णय?

सेंट्रल बोर्ड फॉर इंडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम अर्थात CBIC नं ८ एप्रिल रोजी यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं असून त्यानुसार बांगलादेशला भारतात विविध ठिकाणी, तसेच नेपाळ, भूतान व म्यानमारमध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी पुरवली जाणारी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्यात आली आहे. ही सुविधा तातडीने बंद करण्यात आल्याचंही या परिपत्रकात नमूद केलं आहे. परिपत्रक निघेपर्यंत जेवढे कार्गो बांगलादेशमधून भारतीय हद्दीत दाखल झाले असतील, त्यांना भारतातून निर्यातीची परवानगी देण्यात आली आहे.

ट्रान्सशिपमेंट (Transshipment Facility) सुविधा म्हणजे काय?

ट्रान्सशिपमेंट सुविधा ही प्रामुख्याने निर्यात केला जाणारा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासंदर्भात असते. बांगलादेशमधून रस्तामार्गे भारतीय हद्दीतील ट्रान्सशिपमेंट केंद्रापर्यंत आणला जातो. यानंतर रस्तामार्गे, रेल्वेमार्गे, हवाई मार्गे किंवा जलवाहतुकीच्या माध्यमातून हा माल भारतात विविध ठिकाणी आणि म्यानमार, भूतान व नेपाळमध्ये पोहोचवला जातो. भारतातील या केंद्राची सुविधा बांगलादेशसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात २९ जून २०२० रोजी परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. तेव्हापासून ही सुविधा बांगलादेशला पुरवली जात होती.

बांगलादेशवर काय परिणाम होणार?

दरम्यान, CBIC आपलं आधीचं परिपत्रक रद्द करून नवीन परिपत्रक काढलं आहे. त्यात ही सुविधा बांगलादेशसाठी बंद करण्यात येत असल्याचं नमूद केलं आहे. यामुळे बांगलादेशला त्यांचा माल भारतात व वर उल्लेख केलेल्या तीन देशांमध्ये पाठवण्यात मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. आता बांगलादेशला हा माल निर्यात करण्यासाठी महागड्या व अधिक वेळ लागणाऱ्या पर्यायांचा वापर करावा लागेल. यातून मालाची किंमत व पोहोच होण्याचा कालावधी या दोन्हींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते मोहम्मद युनूस?

बांगलादेशमधील हंगामी सरकारचे सल्लागार झाल्यापासून युनूस यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. भारत व बांगलादेशचे द्विपक्षीय संबंध व भारताचे चीनशी असणारे संबंध लक्षात घेता त्यांनी आधी भारताच्या दौऱ्यावर येणं अपेक्षित होतं. मात्र, भारताचा दौरा ऐनवेळी रद्द करून युनूस चीनच्या दौऱ्यावर गेले. यानंतर बीजिंगमध्ये त्यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.

“भारताच्या पूर्वेकडील राज्य कोणत्याही बाजूने समुद्राशी जोडलेली नाहीत. त्यामुळे बांग्लादेश हाच या भागातील समुद्राचा एकमेव पालक आहे. यातून खूप मोठ्या संधी निर्माण होतात. चिनी अर्थव्यवस्थेसाठी ही जमेची बाजू ठरू शकते”, असं युनूस म्हणाले होते. यातून बांगलादेशला पूर्वेकडच्या राज्यांमध्ये चीनच्या मदतीने आपले हितसंबंध प्रस्थापित करायचे असल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय युनूस यांनी बीजिंग दौरा करून चीनला बांगलादेशचं धोरणात्मक मित्र राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळेही भारताला या दौऱ्याची दखल घ्यावी लागली. यातून भारत व बांगलादेशमधील संबंध ताणले गेल्याचं दिसून येत आहे.