मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक पार पडते आहे. इंडियाची ही तिसरी बैठक आहे. याआधीच्या दोन बैठका अनुक्रमे पाटणा आणि बंगळुरु या ठिकाणी पार पडल्या. मुंबईत तिसऱ्या बैठकीला सुरुवात व्हायची आहे त्याआधीच पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून तीन नावं समोर आली आहेत. सर्वात पहिलं नाव चर्चेत आहे ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं. त्यानंतर काही तासातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही नाव समोर आलं. तर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव चर्चेत आलं आहे.
अखिलेश यादव पीएम पदासाठी योग्य उमेदवार-सपा
समाजवादी पक्षाच्या नेत्या जुही सिंह यांनी असं म्हटलं आहे की अखिलेश यादव हेच इंडियाच्या वतीने पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा असले पाहिजेत. अखिलेश यादव यांचं नाव जर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं तर समाजवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं झालं तर आनंदच होईल असंही त्या म्हणाल्या. अखिलेश यादव यांच्यात ती क्षमताही आहे. आता आघाडी काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अरविंद केजरीवाल यांचंही नाव चर्चेत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचंही नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आहे. कारण INDIA च्या मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या आधी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अरविंद केजरीवाल यांचं नाव चर्चेत आलं आहे. आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी ही मागणी केली आहे की अरविंद केजरीवाल यांचं नाव पंतप्रधान पदासाठी दिलं जावं कारण एवढ्या प्रचंड महागाईतही दिल्लीत त्यांनी महागाई नियंत्रणात ठेवली आहे. दिल्लीत पाणी, वीज, शिक्षण, महिलांसाठी बस सेवा हे मोफत आहे. वृद्ध व्यक्तींसाठी तीर्थ यात्रा मोफत आहे. या सगळ्या गोष्टी देशातही करता येऊ शकतात. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अरविंद केजरीवाल हे योग्य नेते आहेत. त्यामुळे त्यांचं नाव जाहीर केलं जावं असं आपला वाटतं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उद्धव ठाकरेंचं नावही समोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर केलं गेलं आहे. शिवसेना उबाठाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी ही मागणी केली आहे की इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असले पाहिजेत. इंडिया आघाडीत सहा मुख्यमंत्री आहेत. वरिष्ठ नेत्यांची एकजूट होते आहे. अशात उद्धव ठाकरे हेच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
INDIA ची तिसरी बैठक मुंबईत उद्यापासून सुरु होते आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे दोन दिवस ही बैठक चालणार आहे. यासंदर्भात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदही घेतली. आता यै बैठकीत काय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.