Fumio Kishida Attacked : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर आज भर प्रचारसभेत हल्ला झाला. एक पाईप बॉम्ब त्यांच्या दिशेने फेकण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यातून फुमियो किशिदा बालंबाल बचावले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचेही वृत्त समोर आले आहे. दरम्यान, या हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध नोंदवला आहे. यासंबंधी नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. भारत सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करतो, असं मोदी म्हणाले आहेत.
हेही वाचा >> जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बॉम्ब हल्ला, भाषण सुरू होण्याआधीच…; पोटनिवडणुकीच्या प्रचारातील घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, “जपानमधील वाकायामा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात घडलेल्या हिंसक घटनेची माहिती मिळाली. जिथे माझे मित्र फुमियो किशिदाही उपस्थित होते. ते सुखरूप असल्याने दिलासा मिळाला. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. भारत सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करतो.”
मोदींसोबत मैत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक पातळीवर सर्वच देशातील मोठ्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हेसुद्धा त्यांचे राजकीय मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी फुमियो भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी दिल्लीत पाणीपुरीचा आस्वाद घेतला होता. तसंच, इतर भारतीय व्यजंनेही त्यांनी चाखून पाहिली. त्यांचा हा व्हिडीओ जगभर तुफान व्हायरल झाला होता.
आज नेमकं काय घडलं?
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारासोबत बोलत उभे होते. तेवढ्यात त्यांच्या दिशेने एक पाईप बॉम्ब फेकण्यात आला. परंतु, तो फुटण्याआधीच किशिदा यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याठिकाणी स्फोटासारखा मोठा आवाज आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आवाज आल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील दृश्यानुसार सभेसाठी आलेले लोक इतरत्र सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. दरम्यान, हा हल्ला झाल्याने किशिदा यांचे येथील भाषण रद्द करण्यात आले. तसंच, फुमियो किशिदा सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.