श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वात मोठय़ा प्रक्षेपणास्त्राच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह रविवारी प्रक्षेपित केले. सर्व उपग्रह नियोजित कक्षेत स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. ‘इस्रो’ची व्यावसायिक उपशाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया प्रा. लि.’ची ही दुसरी यशस्वी मोहीम आहे.
कमी उंचीच्या कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट) एकूण ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने ब्रिटनच्या नेटवर्क अॅक्सेस असोसिएट्स लि. (वनवेब ग्रूप कंपनी) सोबत करार केला आहे. त्यातील पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. तर उर्वरित ३६ उपग्रहांचा दुसरा ताफा रविवारी सकाळी ९ वाजता तमिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या तळावरून प्रक्षेपित करण्यात आला. उड्डाणानंतर प्रक्षेपणास्त्राने सर्व उपग्रह क्रमाक्रमाने त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये प्रस्थापित केले. त्यामुळे ‘एलव्हीएम३-एम३/ वनवेब इंडिया-२’ यी मोहिमेची यशस्वी सांगता झाल्याचे इस्रोने जाहीर केले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल एनएसआयएल, इस्रो आणि वनवेब यांचे अभिनंदन केले. ‘वन वेब’ने सर्व उपग्रहांशी यशस्वीरीत्या संपर्क प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंह यांनी यशस्वी मोहिमेसाठी इस्रोचे अभिनंदन केले आहे. ‘एनव्हीएम ३द्वारे वन-वेबचे ३६ उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्याबद्दल एनएसआयएल, इन-स्पेस, इस्रो यांचे अभिनंदन. जागतिक दळणवळण उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये भारताचे वाढते महत्त्व यामुळे अधोरेखित झाले असून हा आत्मनिर्भरतेचा खरा प्राण आहे,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.
मोहिमेची वैशिष्टय़े
’एकाच वेळी ३६ उपग्रहांची नियोजित कक्षेत स्थापना
’उपग्रहांचे एकूण वजन (पेलोड) ५,८०५ किलो
’‘वन-वेब’ कंपनीसाठी पहिली यशस्वी व्यावसायिक मोहीम
’गरजा पूर्ण करण्यासाठी ‘क्रायोजेनिक’ टप्प्यामध्ये कौशल्यपूर्ण संचलन
‘गगनयान’साठी एलव्हीएम उपयुक्त
* भारताची महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम, ‘गगनयान’साठी एलव्हीएम-३ हे प्रक्षेपणास्त्र उपयुक्त ठरेल, असे इस्रोने म्हटले आहे.
* या प्रेक्षपणास्त्रावर गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेली एस २०० मोटर असल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी नमूद केले. * एलव्हीएममध्ये नजीकच्या काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून ते मानवी मोहिमांसाठी उपयुक्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.