भाजपा पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टिप्पणीचे पडसाद उमटत आहेत. इराण, सौदी अरेबिया यांच्यासारख्या इस्लामिक देशांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्ताननेही या टिप्पणीनंतर आपला निषेध व्यक्त केला आहे. भारतात मुस्लिमांचा छळ केला जातोय असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेदेखील चोख उत्तर दिले असून पाकिस्तानने तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करावे, असे भारताने म्हटले आहे.
हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: OICने केली कारवाईची मागणी, अवास्तव आणि संकुचित विचार असल्याची भारताची प्रतिक्रिया
“पाकिस्तानमधून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांची आम्ही नोंद घेत आहोत. ज्या देशात अल्पसंख्याकांवर अन्याय केला जातोय तो देश भारतामधील अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर भाष्य करत आहे. पाकिस्तानमध्ये शिख, ख्रिश्चन, हिंदू आणि अहमदिया यांचा छळ होत असल्याचे समस्त जगाने पाहिलेले आहे” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरबिंदम बागची म्हणाले आहेत.
हेही वाचा >> कानपूरनंतर आग्रा येथे दोन समुदायांमध्ये हाणामारी; दुचाकीच्या किरकोळ अपघातानंतर दगडफेक
तसेच “भारत सरकार सर्व धर्मियांचा आदर करतो. पाकिस्तानमध्ये धर्मांध लोकांचे कौतुक केले जाते. धर्मांध लोकांचे पुतळे बांधले जातात. तसे आमच्या देशात होत नाही. पाकिस्तानने अल्पसंख्याकांची सुरक्षा, कल्याण यावर लक्ष्य केंद्रीत करावे. तसेच भारतातील शांतता बिघडवण्याचा, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये,” असेदेखील बागची यांनी म्हटलंय.
हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल सौदी अरेबियाची नाराजी; नुपूर शर्मांच्या निलंबनाचं स्वागत
दरम्यान, नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर रविवारी पाकिस्तानने तेथील भारतीय प्रतिनिधींना पाकिस्तानची नाराजी तसेच निषेध कळवण्याचे सांगितले. तर उत्तरादाखल प्रेषित मोहम्मद यांच्यावर करण्यात आलेली टिप्पणी पूर्णपणे अस्विकारार्ह आहे. तसेच पाकिस्तानमधील नागरिकच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांच्या भावाना दुखावल्या गेल्याचे आम्हाला दु:ख आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.