करोना विषाणू साथीविरुद्धच्या लढाईत भारतानं एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. देशानं आज २०० कोटी लशींचा टप्पा पार केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षांत भारताने २०० कोटी (२ अब्ज) कोविड-१९ लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. गेल्यावर्षी २१ ऑक्टोबरपर्यंत देशाने १०० कोटींचा टप्पा पार केला होता. यानंतर अवघ्या नऊ महिन्यात भारतानं २०० कोटी लशींचा टप्पा पार केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “१७ जुलै २०२२ हा दिवस कायमस्वरुपी लक्षात राहिल. #200CroreVaccinations” या ट्वीटसोबत मांडविया यांनी CoWIN पोर्टलच्या डॅशबोर्डचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये लसीकरणाचा आकडा २०० कोटीचा टप्पा ओलांडताना दिसत आहे.
शनिवारी देशभरात २५.२ लाखांहून अधिक लशी टोचण्यात आल्या होत्या. त्यानंतर रविवारी सकाळी १.३ लाख डोससह भारतानं लसीकरणाच्या बाबतीत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी सरकारने १५ जुलैपासून ७५ दिवसांसाठी सर्व प्रौढांसाठी बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर लसीकरणाच्या संख्येत वाढ झाली. तत्पूर्वी, तिसरा डोस केवळ आरोग्य कर्मचारी, करोना वॉरिअर्स आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच मोफत उपलब्ध होता. मागील सात दिवसांत सरासरी १३.६ लाख डोस देण्यात आले. या तुलनेत भारताने शनिवारी २५ लाख डोस आणि रविवारी २२ लाख डोस दिले आहेत.