लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सलग नऊ दिवस दहा हजारांच्या आसपास वाढणारी संख्या शुक्रवारी ११ हजारांच्या जवळ पोहचली होती. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. गेल्या २४ तासांत दिवसभरात ११,४५८ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ८ हजार ९९३ इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचेही सांगितले. १ लाख ५४ हजार ३३० रुग्ण बरे झाले असून १ लाख ४५ हजार ७७९ रुग्ण उपाचाराधिन आहेत. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने एक लाख करोनाबाधित रुग्णांची संख्या ओलांडली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, प. बंगालमध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
India crosses 3 lakh mark as it reports the highest single-day spike of 11,458 new #COVID19 cases; total cases rise to 308993; 386 deaths in the last 24 hours. There are 145779 active cases, 154330 cured/discharged/migrated & 8884 deaths in the country so far: Ministry of Health pic.twitter.com/BL5k2J3dbE
— ANI (@ANI) June 13, 2020
देशातील एकूण बळींची संख्या ९ हजारांकडे गेली आहे. गेल्या २४ तासांत ३८६ करोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत देशात ८ हजार ८८४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेले दोन दिवस मृत्यूची संख्या ३०० हून अधिक आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अनुक्रमे ३५७ आणि ३९६ मृत्यू झाले आहेत. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे.