Kerala Youth Died In Russia-Ukraine War : गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांतील अनेकांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर या युद्धात भारतातील काही तरुणही सहभागी झाले आहेत. अशात युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन मिलिटरी सपोर्ट सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या केरळमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने आक्रमक भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सैन्यातील उर्वरित भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी परत पाठवण्याची मागणी केली आहे.
भारताची आक्रमक भूमिका
“आज मॉस्कोमधील रशियन अधिकाऱ्यांसोबत तसेच नवी दिल्लीतील रशियन दूतावासमोर याबाबत भारताने आक्रमकपणे आपली बाजू मांडली. त्याचबरोबर उर्वरित भारतीय नागरिकांना लवकरात लवकर भारतात पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे,” याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.
केरळातील त्रिशूरचा इलेक्ट्रिशियन बिनिल टीबी, रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या युक्रेनियन प्रदेशात अडकून पडल्यानंतर युद्ध क्षेत्रात मरण पावला अशी माहिती समोर आली होती. बिनिलबरोबर रशियाला गेलेला त्याच्या एका नातेवाईकालाही फ्रंटलाइन सेवेत नियुक्त करण्यात आले होते, तो देखील यामध्ये जखमी झाला आहे.
पासपोर्ट जप्त
दरम्यान, आयटीआय मेकॅनिकल डिप्लोमाधारक असलेले बिनिल (३२) आणि जैन (२७) हे ४ एप्रिल रोजी इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर म्हणून काम मिळेल या आशेने रशियाला गेले होते. पण, रशियात गेल्यानंतर त्यांचे भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना रशियन मिलिटरी सपोर्ट सर्व्हिसचा भाग म्हणून युद्ध क्षेत्रात तैनात करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिला आहे.
मायदेशी परतण्याचे प्रयत्न अपयशी
बिनिल व जैन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घरी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. गेल्या महिन्यात बिनिलने दी इंडियन एक्सप्रेसला काही व्हॉईस मेसेजेस पाठवले होते. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की तो गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून भारतात परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो सातत्याने मॉस्कोमधील दूतावासाशी संपर्क साधत होता. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
आम्ही खूप थकलेलो आहोत…
केरळमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या बिनिलने सांगितलं होतं की “मानसिक व शारीरिकदृष्ट्या आम्ही खूप थकलेलो आहोत. आम्ही रशियाव्याप्त युक्रेनच्या भागात आहोत. आमचे कमांडर आम्हाला सांगत आहेत की तुमचा एक वर्षाचा करार होता. त्यामुळे तुम्हाला असं अर्ध्यातून परत जाता येणार नाही. आम्ही आमच्या सुटकेसाठी स्थानिक कमांडर्सकडे विनवण्या करत आहोत. मात्र ते आम्हाला इथून माघारी परतू देत नाहीत. त्यानंतर आता थेट बिनिलच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.