चीनमधून दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यावर आणखी एका वर्षांसाठी बंदी कायम ठेवण्याची शिफारस विविध मंत्रालयांच्या एका पॅनलने केली आहे. सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्याची कोणतीही माहिती चीनने अद्यापही न दिल्याने बंदी शिफारस करण्यात आली आहे.
प्लास्टिक आणि खते बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेलामाइनचा अंश आढळल्याने भारताने चीनमधून आयात करण्यात येणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यावर सप्टेंबर २००८ मध्ये बंदी घातली होती. दर वर्षी बंदीची मुदत वाढविण्यात येत होती. या वर्षीची मुदत २३ जून रोजी संपुष्टात येणार होती.
तथापि, या स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असल्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत आणखी एका वर्षांसाठी बंदी कायम ठेवावी, अशी सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाने विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर केली.
चीनमधून आयात होणारी चॉकलेट, चॉकलेट उत्पादने, दूध आणि दुधाची भुकटी आदींवरील बंदीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. तथापि, मेलामाइन घटक आढळल्याच्या पाश्र्वभूमीवर स्थितीत सुधारणा झाली असल्याबाबतचा कोणताही अहवाल चीनकडून प्राप्त झालेला नाही. त्यामुळे बंदी वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
आशिया आणि आफ्रिकेतील जवळपास १२ हून अधिक देशांनी चीनकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या आयातीवर बंदी घातली आहे. मेलामाइन हे रसायन आढळल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. मेलामाइन या रासायनिक पदार्थामुळे मूतखडा अथवा एखादा अवयव निकामी होण्याचा धोका असतो. भारत चीनकडून दुग्धजन्य उत्पादनांची आयात करीत नाही. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा