Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडत भारतात दाखल झाल्या आहेत. सध्या त्या भारतात आहेत. मात्र, शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशमध्ये लष्कराने अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केलेली आहे.
बांगलादेशमधील या सर्व घडामोडींचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आज भारतात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठीकनंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर माहिती देत संसदेत निवदेन केलं. “शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर भारतात येण्यासाठी विनंती केली होती”, अशी महत्वाची माहिती परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी संसदेत दिली.
हेही वाचा : राजीनामा दिला, आता शेख हसीना पुढे काय करणार? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, पण…”
Suo-moto statement in Rajyasabha on the situation in Bangladesh. https://t.co/ceM41AEATE
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 6, 2024
एस.जयशंकर काय म्हणाले?
डॉ.एस.जयशंकर संसदेत बोलताना म्हणाले, “बांगलादेशमध्ये जुलै महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. तेथील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता. मात्र, त्यानंतरही त्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरू होत्या. बांगलादेशातील आंदोलनकर्त्यांना शेख हसीना यांना हटवायचं होतं. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकराच्या घटना तेथे सुरु होत्या. हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बांगलादेश सोडताना त्यांनी भारतात येण्यासाठी विनंती केली होती”, अशी माहिती एस.जयशंकर यांनी संसदेत बोलताना दिली.
“बांगलादेशमध्ये घडणाऱ्या सर्व घटनांच्या आणि हिंसाचाराच्या घटनांवर आणि घडामोडींवर भारताची नजर आहे. बांगलादेशमध्ये सध्या जवळपास ९ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. तसेच बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधी हिंसा ही चिंतेची बाब आहे. तसेच सर्व परिस्थिती पाहता भारत आणि बांग्लादेश सीमांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे”, अशी माहिती परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी दिली.
बांगलादेशच्या मुद्द्यावर काय झाली चर्चा?
बांगलादेशच्या मुद्द्यावर भारतात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाची चर्चा झली. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं की, “सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीत बांगलादेशमधील घडामोडींसंदर्भात माहिती देण्यात आली. सर्व पक्षांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांचे आभार”, असं एस.जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितलं.
शेख हसीना यांची पुढची योजना काय?
बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी भारतात तात्पुरता आश्रय घेतला असला तरी त्यांच्या आश्रयासंदर्भात भारताने अद्याप ठोस कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावरून सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींनी सरकारला शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबतही विचारणा केली. मात्र, त्यावर सविस्तर उत्तर देण्यास जयशंकर यांनी नकार दिला. “भारत सरकारनं यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातली माहिती आत्ताच उघड करता येणार नाही”, असं जयशंकर यांनी सांगितलं.