कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना फाशीची शिक्षा कतार न्यायालयाने सुनावली आहे. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी होते. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. अशात आता भारत सरकारने त्यांच्या बचावासाठी कतार न्यायालयात दाद मागितली आहे. भारताने नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना जी फाशीची शिक्षा सुनावली त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे अपील दाखल केलं आहे.
कतारमध्ये ज्या माजी भारतीय अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्यातले काही अधिकारी असे आहेत ज्यांनी भारतीय युद्धनौकांचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिस या कंपनीसाठी काम करत होते. ही कंपनी कतारमधल्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. या आठ जणांवर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता त्यांना वाचवण्याठी भारताने पावलं उचलल्याचं कळतं आहे. NDTV ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
नौदलाचे माजी कर्मचारी कतारमध्ये काय करत होते?
प्राप्त माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अॅण्ड कन्सलटन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करत होते. ही कंपनी सैन्य दलाशी निगडीत उपकरणे पुरवते. शिवाय संरक्षण आणि इतर सुरक्षा एजन्सींची स्थानिक व्यावसायिक भागीदार आहे आणि संरक्षण उपकरणांची देखभाल करते. हे आठ कर्मचारी मागील चार ते सहा वर्षांपासून कंपनीत काम करत होते. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक निवृत्त कमांडर पूर्णेंदू तिवारी, फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. २०१९ मध्ये त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कतारची गुप्तचर संस्था एसएसबीने या आठ जणांना ३० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. दोहास्थित भारतीय दूतावासास सप्टेंबरमध्ये त्यांच्या अटकेबाबत माहिती मिळाली होती. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारला त्यांना सुखरुप परत आणण्याचे आवाहन केले आहे.