लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात समविचारी, धर्मनिरपेक्ष, काँग्रेसविरोधी, काँग्रेस-भाजपेतर अशा विविध प्रकारच्या आघाडय़ांची चर्चा सुरू असतानाच अभिनेते व भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस व भाजपने एकत्रितपणे सरकार स्थापावे, असा पर्याय मांडला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास छोटय़ा व प्रादेशिक पक्षांकडून होणारे दबावाचे राजकारण टाळण्यासाठी काँग्रेस व भाजपने संयुक्तपणे सरकार स्थापन करावे, असे मत त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘भारत प्रथम’ (इंडिया फर्स्ट) या संकल्पनेला साजेसा असा हा आपला दृष्टिकोन आहे, असे सिन्हा यांनी वॉशिंग्टन भेटीदरम्यान दिलेल्या मुलाखतीत म्हटले. ‘पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास छोटय़ा व प्रादेशिक पक्षांकडून होणाऱ्या दबावाला रोखण्यासाठी अशी आघाडी उपयुक्त आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास देशाला एक मजबूत आणि स्थिर राष्ट्रीय सरकार मिळेल. ही सध्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. काँग्रेस व भाजपमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. यात परकीय धोरण, संरक्षण मुद्दे आणि आर्थिक धोरणांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रम आखल्यास गरिबी, भ्रष्टाचार आणि पारदर्शकता याबाबतीत ते सरकार चांगली कामगिरी करेल, असे ते म्हणाले. दोन्ही पक्षांपैकी ज्याला सर्वाधिक जागा मिळेल, त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असेही ते म्हणाले.
हे आपल्या पक्षाचे मत नाही, असे सांगण्यास सिन्हा विसरले नाहीत. मात्र, भविष्यात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष असा विचार करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अर्थात, आपला पहिला पर्याय केंद्रात भाजपचे बहुमतातील सरकार सत्तेत येणे, हाच असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकारणात आता कोणीही अस्पृश्य राहिलेले नाही, असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडय़ांची उदाहरणे दिली.
काँग्रेस आणि भाजपमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होण्याची वेळ आता टळून गेली आहे. मात्र, राष्ट्रहितासाठी या दोन्ही पक्षांनी लवचिकता दाखवून निवडणुकोत्तर आघाडी करावी. मोदी म्हणतात, भारत प्रथम. त्याच धर्तीवर ‘देशापेक्षा पक्ष आणि राजकारण मोठे नाही’ असे मला म्हणायचे आहे.
शत्रुघ्न सिन्हा, भाजप नेत़े

Story img Loader