स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ ही नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. खोल समुद्रातील चाचण्यांकरता आज ‘विक्रांत’ कोची बंदरातून रवाना झाली. या चाचण्या यशस्वी झाल्या तर लवकरच ४० हजार टन वजनाची ‘आयएनएस विक्रांत’ नौदलात दाखल होईल.
२००९ साली ‘आयएनएस विक्रांत’च्या बांधणीला कोचीमध्ये सुरुवात झाली. २०१४ साली तिचे जलावतरण झाले. विक्रांतच्या प्राथमिक चाचण्या या कोची बंदराजवळ नुकत्याच पूर्ण झाल्या होत्या. आता पुढील काही आठवडे ‘आयएनएस विक्रांत’च्या खोल समुद्रात सखोल चाचण्या घेतल्या जातील. यामध्ये विमानवाहू युद्धनौकेची कार्यक्षमता तपासली जाईल, सर्व उपकरणांच्या चाचण्या घेतल्या जातील तसेच युद्धनौकेवरून लढाऊ विमान आणि विविध हेलिकॉप्टर यांची पूर्ण क्षमतेने उड्डाणे होतील. स्वबळावर विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान जगात फक्त मोजक्या देशांकडे आहे, यामध्ये आता भारतही दाखल होणार आहे.
सध्या भारताकडे ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. ‘विक्रमादित्य’ ही रशियाकडून नूतनीकरण करत आपण विकत घेतली आहे. याआधी ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौका इंग्लंडकडून घेतल्या होत्या, ज्या आता नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.
आपल्या शेजारी असणाऱ्या चीनचे वाढते नौदल सामर्थ्य लक्षात घेता ‘आयएनएस विक्रांत’च्या समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणे ही भारतीय नौदलासाठी एक मोठी जमेची गोष्ट ठरली आहे.