पीटीआय, पॅरिस
भारत आणि फ्रान्समधील व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करतानाच हिंद-प्रशांत क्षेत्रासह विविध जागतिक व्यासपीठांवरील संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांच्यात बुधवारी प्रदीर्घ द्विपक्षीय चर्चा झाली. माक्राँ यांच्याबरोबर विमानाने मार्से येथे जाताना उभयतांत चर्चा झाली. दोन्ही देशांतील संबंध नव्या उंचीवर गेल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी सांगितले.
मोदी आणि माक्राँ यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्राला फायदा होण्यासाठी आवश्यक कृती करण्यासंबंधी कटिबद्धता राखण्याचे चर्चेत अधोरेखित केले. या चर्चेत जागतिक आणि प्रादेशिक मुद्देही उपस्थित झाले.
दोन्ही देशांच्या भेटीनंतर संयुक्त निवेदन प्रसृत करण्यात आले. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा, भारताच्या कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी फ्रान्सकडून पाठिंब्याचा पुनरुच्चार, द्विपक्षीय सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न याविषयी माहिती देण्यात आली. तसेच संरक्षण, नागरी आण्विक ऊर्जा, अवकाश आदी क्षेत्रांसंबंधी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
भारतफ्रान्स अणुभट्टी उभारणार
भारत आणि फ्रान्सने बुधवारी संयुक्तरीत्या अत्याधुनिक अणुभट्टी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. ऊर्जा सुरक्षेमध्ये अणुशक्ती महत्त्वाचा घटक असल्यावर यातून भर देण्यात आला. दोन्ही देशांनी ‘स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर’ (एसएमआर) आणि ‘अॅडव्हान्स्ड् मॉड्युलर रिअॅक्टर’ (एएमआर) तयार करण्याची इच्छा दर्शविणाऱ्या पत्रावर सही केली.
मोदी अमेरिकेला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचा दौरा आटोपून अमेरिकेला निघाले. ते भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा पोहोचतील. दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यादरम्यान ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होण्याची अपेक्षा आहे, मात्र त्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेला भेट देणारे तसेच द्विपक्षीय भेट घेणाऱ्या सुरुवातीच्या काही जागतिक नेत्यांमध्ये मोदी यांचा समावेश आहे.
सावरकरांना अभिवादन
मार्सेमध्ये मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती जागवल्या. मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराचे वेगळे महत्त्व आहे. याच ठिकाणी वीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी धाडसी प्रयत्न केला होता.