Sunita Williams On How India Looks From Space: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांनंतर नुकत्याच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळातील त्यांच्या नऊ महिन्यांच्या दीर्घ वास्तव्यादरम्यान तिथून भारत कसा दिसतो याबद्दल सुनीता विल्यम्स यांनी अनुभव सांगितले आहेत. विल्यम्स यांनी सांगितलेल्या या अनुभवांमध्ये हिमालय, मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्यावरील मच्छिमारांचा खास उल्लेख आहे.

“भारत अद्भुत आहे. आम्ही जेव्हा जेव्हा हिमालयावरून गेलो तेव्हा तेव्हा बुच विल्मोर यांनी हिमालयाचे काही अविश्वसनीय फोटो टिपले होते, ते खरोखरच आश्चर्यकारक आहेत. अंतराळातून हिमालय लहरींसारखा दिसतो”, असे सुनीता विल्यम्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

मुंबई आणि मच्छीमारांचा खास उल्लेख

“मला वाटतं जेव्हा तुम्ही पूर्वेकडून गुजरात आणि मुंबईसारख्या भागांमध्ये जाता तेव्हा तिथल्या किनाऱ्याजवळील मासेमारी करणाऱ्या जहाजांवरून तुम्हाला ‘आपण पोहचलो आहोत’ असा इशारा मिळतो,” या शब्दांत सुनीता विल्यम्स यांनी त्यांचे अंतराळातील अनुभव सांगितले.

भारत भेटीवर भाष्य

दरम्यान या पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या संभाव्य भारत भेटीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, “मला आशा आहे की मी माझ्या वडिलांच्या देशात जाईन. तिथे मी अ‍ॅक्सिओम मिशनवर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांनाही भेटेन. आम्ही आमचे अनुभव त्यांच्यासोबत शेअर करू.”

अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती

सुनीता यांनी अंतराळ संशोधनातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले असून, भारताच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी भारताचे वर्णन एक “महान देश” आणि “अद्भुत लोकशाही” असे केले.

नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ९ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून १९ मार्च रोजी पृथ्वीवर परतल्या होत्या. १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले होते.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळात गेले होते. मात्र बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) येथे घालवावे लागले होते.

अंतराळवीरांना घेऊन येणाऱ्या बोईंग स्टारलायनर या यानात काही तांत्रिक अडचणी आल्याने नासाला त्यांची योजना बदलावी लागली होती. ५ जून २०२४ रोजी बोईंग स्टारलायनरच्या माध्यमातून विल्यम्स आणि विल्मोर हे अंतराळात गेले होते. त्यांची ही मोहिम अवघ्या आठ दिवसांसाठी नियोजित होती मात्र त्यांना २८६ दिवस अंतराळात राहावे लागले.

Live Updates