रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर बांगलादेशने घेतलेली भूमिका योग्य आहे, असे भारताने म्हटल्याचा दावा तेथील एका वृत्तवाहिनीने केला आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र खात्यातर्फे किंवा केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यातर्फे या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘एएनआय’ या वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि सुषमा स्वराज यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी त्यांनी रोहिंग्या मुस्लिमांबाबतच्या भूमिकेवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
रोहिंग्या मुस्लिमांचे पलायन रोखण्यासाठी थेट चर्चेच्या माध्यमातून आणि इतर देशांसोबत एकत्र येत म्यानमारवर दबाव आणला जात आहे. तसेच ज्या मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे त्यांना म्यानमारने परत बोलवावे असाही सल्ला म्यानमारला दिला आहे, असे सुषमा स्वराज यांनी म्हटल्याचे बांगलादेशी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. रोहिंग्या मुस्लिम ही फक्त बांगलादेशची नाही, तर जागतिक समस्या आहे, असेही स्वराज यांनी हसीना यांना सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
माणुसकीचा दृष्टीकोन समोर ठेवूनच आम्ही रोहिंग्या मुस्लिमांना आमच्या देशात आश्रय दिला आहे. काही काळासाठी आम्ही या मुस्लिमांसाठी जमीनही अधिग्रहित केली आहे. मात्र त्यांचा मुक्काम जर वाढला, तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. रोहिंग्या मुस्लिमांसाठी अन्न, निवारा आणि औषधोपचार यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र म्यानमारने त्यांना देशात परत बोलवावे, असे मत हसीना यांनी व्यक्त केल्याचे या वाहिनीने म्हटले आहे.
२५ ऑगस्टला म्यानमारमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर रोहिंग्या मुस्लिमांनी देश सोडला. देश सोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोहिंग्या म्यानमारमधील अल्पसंख्याक आहेत. म्यानमारच्या नेत्या आँग-सान-स्यू की यांनी या हिंसाचाराविरोधात अवाक्षरही काढलेले नाही. अशात आता भारत बांगलादेशच्या भूमिकेशी सहमत असल्याची माहिती समोर आली आहे.