करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यापूर्वी १९७९-८०मध्ये ग्रोथ रेट -५.३ टक्के नोंदवला गेला होता. तेव्हा देशात दुष्काळजन्य स्थिती होती. तसेच कच्च्या तेलाचे भावही दुप्पट झाले होते.

आर्थिक वर्ष २०१९-२० या कालावधीत जीडीपी ४ टक्के होता. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात ८ टक्के जीडीपी घसरेल असा अंदाज बांधला होता. मात्र २०२०-२१ या वर्षात जीडीपी ७.३ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. चौथ्या तिमाहीत ग्रोथ रेट १.६ टक्के नोंदवला गेला. मागच्या वर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती. तेव्हा अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं होतं. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन तिमाहीत भारताचा जीडीपी निगेव्हटी ग्रोथ दाखवत होता. मात्र चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे.

जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध केली जाते. जीड़ीपीसाठी देशातील उत्पादन आणि सेवांचा विचार केला जातो. कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रात उत्पादन घटलं कींवा वाढलं यावर सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीवर देशाच्या आर्थिक विकासाची गणितं बांधली जातात. मात्र लॉकडाउन आणि वाढत्या करोना रुग्णांमुळे त्याचा प्रभाव या क्षेत्रांवर पडला. दुसरीकडे, चीनमध्ये जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत १८.३ टक्क्यांनी जीडीपी वाढला आहे.

लॉकडाउन ठरला जीवनरक्षक! फक्त करोनाच नाही, तर अन्य आजारांपासून वाचले कोट्यवधी लोकांचे प्राण

एप्रिल २०२१ या महिन्यात एकूण १ लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीत केंद्राचा २७,८३७ कोटी, राज्याचा ३५,६२१ कोटी, एकीकृत जीएसटी ६८,४८१ कोटी आहे. त्यात उपकर ९,४४५ कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यात १ लाख २३ हजार ९०२ कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.